मोफत प्रवासापासून सावित्रीच्या लेकी वंचित, पालकांचा रस्ता रोको करण्याचा ईशारा


शेवगाव प्रतिनिधी, दि. ८ : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेअंतर्गत पास मिळूनही तालुक्यातील  खानापूरच्या जिजामाता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना बस थांबत नसल्याने शिक्षणापासून वंचित होण्याची वेळ आली आहे.

मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावर असलेले खानापूरच्या जिजामाता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात पैठण तालुक्यातील सरहद्दीवरील सोनवाडी, तेलवाडी, क-हेटाकळी, गदेवाडी, घारी या परिसरातून मुले-मुली शिक्षणासाठी येतात.राज्य परिवहन मंडळाच्या मोफत पास योजनेअंतर्गत विद्यालयातून ५९ विद्यार्थ्यांनिंना मोफत पास उपलब्ध झाले असतानाही निवळ एसटी चालक वाहकाच्या मनमानी व अडेलतट्टू भूमिकेमुळे या विद्यार्थ्यांसाठी बस थांबविली जात नाही.

या संदर्भात अनेक पालकनी वरिष्ठाकडे तक्रार केली आहे. तरी देखील या मार्गावरून धावणाऱ्या स्थानिक बसेसचे चालक वाहक जुमानत नाहीत. या विद्यालयाची शालेय कामकाजाची वेळ सकाळी १० ते ४ अशी विद्यार्थ्यांच्या सोईसाठी ठेवलेली आहे. या संबंधाने विद्यार्थ्यांसाठी चार वाजता शेवगाव वरून स्वतंत्र बस सोडल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होण्यास मदत होऊ शकते. या अगोदर तेलवाडीसाठी स्वतंत्र बस सोडली जात होती, परंतु ती देखील बंद झाल्याने विद्यार्थ्यांची अडचण वाढली आहे. 

शिक्षक पालक संघाच्या बैठकीत खानापूर येथे तसेच तेलवाडी, सोनवाडी येथे बस थांबा देऊन स्वतंत्र बस सुरू करण्याची मागणी करण्यात आली. तसा ठराव मंजूर करण्यात आला असून नजीकच्या काळात स्वतंत्रपणे बस न सोडल्यास रस्ता रोको करण्याचा इशारा खानापूरच्या सरपंच शितल मंगेश थोरात यांनी व ग्रामस्थांनी दिला आहे.

एसटी बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना स्टँडवर ताटकळत थांबावे लागते. बस थांबली तर अनेकदा फक्त विद्यार्थिनीना घेऊन विद्यार्थ्यांना घेण्यास  नकार दिला जातो.  म्हणून शेवगाव आगाराने चार वाजता शेवगाव पैठण ही स्वतंत्र बस सोडावी जेणेकरून विद्यार्थ्यांनाही लाभ होईल व प्रवाशांना सुद्धा त्याचा लाभ घेता येईल अशी मागणी विद्यालयाचे प्राचार्य महादेव मासाळकर यांनी केली आहे.

असे न झाल्यास विद्यार्थ्यासमवेत पालक व खानापूर ग्रामस्थ विद्यालयासमोर शेवगाव पैठण मार्गावर रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. याची एसटी प्रशासनाने नोंद घेऊन चार वाजता पैठणसाठी  बस सुरू करण्यात यावी. तसेच चार ते पाच वाजे दरम्यान येणाऱ्या सर्व बसेसना खानापूर तेलवाडी सोनवाडी, क-हेटाकळी येथे थांबा मंजूर करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.