कोपरगाव प्रतिनिधी, दि.८ : निळवंडे कालव्याचे पाणी कोपरगाव तालुक्यांतील गावांना उपलब्ध व्हावे यासाठी मोठा संघर्ष झाला. काही दिवसापूर्वी साठवण बंधारे भरले जावे यासाठी नागरिकांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. मात्र प्रशासंन दिलेला शब्द पूर्ण करत नसल्याने रांजणगाव व अंजनापुर येथील महिला व नागरिक संतप्त होऊन आज ९ डिसेंबर २०२३ पासून बंधारा निळवंडे पाण्याने भरून देत नाही तोवर आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना देण्यात आले आहे.
कोपरगांव तालुक्यातील रांजणगाव, अंजनापुर नं. ३ चा तलाव निळवंडे पाण्याने भरून देण्याबाबत ग्रामस्थांनी तीव्र भूमिका घेतली आहे. कोपरगांव लाभ क्षेत्रामध्ये निळवंड्याचे पाणी ५३ वर्षानंतर आलेले असुन रांजणगाव-अंजनापुर नं.३ (मर्याईचा बंधारा) अद्यापही भरलेला नाही. पाणी वहन सध्याचे परिस्थितीमध्ये सुरू आहे. रांजणगांव देशमुख येथे दि.१६ नोव्हेंबर रोजी आमरण उपोषण झाले. त्यात देखील बंधारा भरण्यात यावा ही प्रमुख मागणी होती.
अंतिम टोकापर्यंत अर्थात टेलपर्यंत पाणी पोहोचल्याशिवाय पाणी बंद करणार नाही असे लेखी आश्वासन दिलेले असतानाही रांजणगाव-अंजनापुर नं. ३ चा बंधारा भरण्यात आलेला नाही. पर्जन्यमान अत्यल्प आणि दुष्काळ सदृश्य परिस्थितीत शेतकरी हवालदिल झालेले असुन बंधारा न भरल्यास पिण्याचे पाणी व पशुधन टंचाईमुळे जगणार नाही. नैसर्गिक असमतोल झाल्याने बिकट परिस्थिती ओढवली आहे.
निळवंडे पाणी येण्यासाठी काही अडचण आल्यास त्याची जबाबदारी देखील प्रशासनाने घेतलेली होती. वर्तमान आणि भविष्याची परीस्थिती पाहता रांजणगाव-अंजनापुर नं.३ चा बंधारा भरणे अत्यंत गरजेचे झालेले आहे. बंधारा भरत नाही तोपर्यंत दिनांक नऊ पासुन सकाळी १२ वाजेपासुन रांजणगाव देशमुख येथे असंख्य महिला आमरण उपोषण करणार आहे अशा स्वरूपाची भूमिका नागरिकांनी घेतली आहे.
प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे जर कृती झाली नाही तर होणाऱ्या परिणामाची जबाबदारी कुणाची असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे. पाण्यासाठी महिलांना उपोषण करण्याची वेळ येणे ही शरमेची बाब असून धरण उशाला आणि कोरड घशाला अशी दुर्दैवी वेळ नागरिकांवर आली आहे. यावेळी अनिता खालकर, लता वर्पे, शांताबाई वर्पे, अलका खालकर, सिंधुबाई गव्हाणे, मंदा वर्पे, रंजना खालकर, मंगल वर्पे, जाईबाई वर्पे, चंद्रकला खालकर, हिराबाई वर्पे, मनीषा वर्पे, शैला वर्पे, भारती वर्पे, दगाबाई गव्हाणे, संजीवनी वर्पे, मिना खालकर, ज्योती वर्पे, योगिता वर्पे, मुक्ता वर्पे, संगीता आदींसह महिलांच्या स्वाक्षरी निवेदनावर आहेत. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.