बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई

शेवगाव प्रतिनिधी, दि. ४ :  विना परवाना बेकायदेशीरपणे शासकीय वाळूची वाहतुक करतांना सुकळी ते लाडजळगाव या रस्त्यावर आढळून आलेल्या दोन विनाक्रमांकाच्या डंपरवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. त्यांच्याकडून दोन डंपर व वाळूसह ३० लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. ही कारवाई पो.काँ. किशोर आबासाहेब शिरसाठ यांच्या फिर्यादीवरुन दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत फिर्यादीत म्हटले आहे की, शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतुक होते. पो.हे.काँ. गणेश भिंगारदे यांना सुकळी ते लाडजळगाव या रस्त्याने वाळू वाहतुक करणारी वाहने येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील भिंगारदे यांच्यासह जालींदर माने, बाळासाहेब गुंजाळ, किशोर शिरसाठ आदींनी बोधेगाव दगुरक्षेत्रील एन.एस.गर्जे व आर.एन खेडकर यांना माहिती दिली. फौजदार एन.एस. गर्जे यांच्यासह   सुकळी लाडजळगाव रस्त्यावर सापळा लावला.

यावेळी दोन विना क्रमांकाचे डंपर तेथून जातांना दिसले. त्यातील वाहन चालक सोमनाथ अशोक आदमाने रा.मुंगी ता.शेवगाव, कुंडलिक विष्णू काकडे रा.तोंडुळी ता. पाथर्डी यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांच्याकडे कुठलाही परवाना आढळून आला नाही. पंचासमक्ष डंपरची पाहणी केली असता त्यामध्ये अवैध वाळू असल्याचे निदर्शनास आले. ३० लाख रुपये किंमतीचे दोन डंपर ८० हजार रुपयांची ८ ब्रास वाळू असा एकुण ३० लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून चालक सोमनाथ आदमाने व कुंडलिक काकडे यांना ही अटक करण्यात आली आहे.