शेवगाव प्रतिनिधी, दि. १ : पक्षाने अवघड परिस्थितीत सत्तेसाठी संघर्ष केलेला आहे. पूर्वी लोक आपल्याकडं येत नव्हते आता ते यायला लागले आहेत. त्यामुळे आपसात भांडत बसू नका. सरकारने, लोकप्रतिनिधीने केलेली कामे लोकांसमोर मांडा. आगामी निवडणुका जिंकण्यासाठी जनसंपर्कापेक्षा लोकांच्या प्रश्नासाठी वेळ देणारांना प्राधान्य दया. एकीने व गनिमी काव्याने लढा. कोणतीच निवडणूक अवघड नाही. असे सांगून प्रामाणिक पणे काम करणाऱ्या प्रत्येकाला न्याय मिळेल. अशी ग्वाही खासदार डॉ.सुजय विखे यांनी दिली.
शेवगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भात आयोजीत भाजप, शिवसेना व मित्र पक्ष कार्यकर्त्यांच्यां आयोजीत मेळाव्यात खासदार विखे बोलत होते. यावेळी आमदार मोनिकाताई राजळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, भाजपचे तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, महिला अध्यक्षा आशा गरड, नितीन काकडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख आशुतोष डहाळे, बापुसाहेब भोसले, बापु पाटेकर,उषा कंगणकर, वजीर पठाण, राजू घनवट, विजय कापरे आदीची उपस्थित होती.
यावेळी खासदार विखे म्हणाले, पक्ष मोठा होतांना नव्या जुन्यांचा वाद होतच असतो. हा वाद आपल्या जागेवर ठेवा. नुसत्या भाषणाने जे साध्य होत नाही ते गनिमी काव्याने मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. बोलणारे लोक प्रचाराला किती न्याय देतात हे पहा. युवकांना व नवीन चेह-यांना उमेदवारी दया. ज्यांना जे पद घ्यायचे असेल त्यांनी पक्षाकडे अर्ज करा. मात्र आरोप प्रत्यारोप करुन चालणार नाही. सरकारच्या माध्यमातून बाजार समितीमध्ये कसा न्याय देता येईल यावर सत्तातंराच्या मागील भुमिका शेतक-यांसमोर मांडा.
प्रत्येक गावात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून निधी मिळाला आहे. रस्त्यासाठी शेवगाव पाथर्डीला १०० कोटी मिळाले आहेत. नेत्यांकडून पक्षाच्या आचार सहितेची अपेक्षा करतांना कार्यकर्त्यांनी देखील ती पाळली पाहीजे. सगळयाच पक्षाच्या कार्यक्रमाला जाणा-या कार्यकर्त्यांमुळे पक्ष मोठा होत नसतो. उमेदवारीचा अर्ज भरा पण ती मिळण्याआधीच फार पुढे जावू नका. नंतर मागे येणे कठीण होते.
आमदार राजळे म्हणाल्या, तालुक्यातील भाजप चिवट, झुंजार व पदरमोड करणा-या कार्यकर्त्यांच्या जीवावर वाढलेला आहे. निवडणुका आल्या की संवाद आणि संघर्ष यात्रा काढणारांनी आमच्या पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता निवडणुका असो वा नसो प्रत्येक कार्यालयात सर्व सामान्य लोकांच्या अडलेल्या कामासाठी झटत असतो हे लक्षात ठेवावे.
प्रतिकुल परिस्थितीत केलेल्या संघर्षामुळे पक्षाला हे दिवस आले. निवडणुकीत एकदिलाने काम केले तर ती सोपी होईल. कार्यकर्त्यांचा बळी जाणार नाही. बाजार समितीचा कारभार पारदर्शी व्हावा, शेतक-यांना सुविधा मिळाव्यात यासाठी सरकारचे चांगले निर्णय शेतक-यांपर्यंत घेवून जावेत. व आलेली परिवर्तनाची संधी दवडू नये.
यावेळी अरुण मंढे, ताराचंद लोढे, तुषार वैदय, भिमराज सागडे, गंगा खेडकर, संभाजी काटे, उमेश भालसिंग, संदिप खरड, महेश फलके, दिनेश मंत्री, वाय.डी कोल्हे, अशोक खिळे, हरिभाऊ झुंबड, अशुतोष डहाळे, सुनिल रासने आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्तविक कचरु चोथे यांनी तर सुत्रसंचालन राजू सुरवसे यांनी केले. तर अमोल सागडे यांनी आभार मानले.