कोपरगावमध्ये अजितदादा आले, पण दररोज पाणी आले नाही

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ :  कोपरगाव तालुक्याच्या विकासासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भलेही कोट्यावधी रुपयांचा निधी दिला. विकासाची गंगा कोपरगाव तालुक्यातील नागरीकांच्या घरा घरापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आमदार आशुतोष काळे करीत आहेत. पण भर पावसाळ्यातही कोपरगावच्या नागरीकांना आठ दिवसाड पिण्यासाठी पाणी मिळत आहे. विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे जलसंपदा मंञी असल्यापासून कोपरगाव तालुक्यात येत आहेत. पण कोपरगावच्या जनतेला दररोज पिण्याचे पाणी काही आले नाही. 

जेव्हा-जेव्हा अजित पवार कोपरगावला येतात तेव्हा-तेव्हा कोपरगावच्या जनतेने मनापासून स्वागत केलं. अजित पवार यांना मानणारा वर्ग तालुक्यात सर्वाधिक आहे. अजित पवार यांच्या सहकार्याने तालुक्यात अनेक योजना आल्या अगदी ४२ कोटींची वाढी पाणी पुरवठा योजना असो किंवा आता नव्याने सुरु झालेली १३१ कोटींची पाणी पुरवठा योजना असो. योजना तर भरपुर आल्या पण आजू तरी नळाला दररोज स्वच्छ पाणी काही आले नाही. तालुक्यातील दोन्ही मातब्बर नेत्यांनी मनापासून प्रयत्न करीत आहेत पण  तरीही त्यांच्या प्रयत्नातुन अपेक्षित पाणी काही मिळाले नाही.

उन्हाळ्यात २१ दिवसाआड तर भर पावसाळ्यात आठदिवसाड पाणी कोपरगावच्या नागरीकांना पिण्यासाठी मिळते. दुर्दैवाने जे पाणी पिण्यासाठी  दिले जाते ते पाणी कधीच स्वच्छ मिळत नाही. गढुळ पाणी पुरवठा करून नागरीकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार कोपरगाव नगरपालिका वारंवार करीत आहे. गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या कोपरगाव शहराला गेल्या अनेक वर्षांपासून कधीच दररोज पाणी मिळाले नाही. गोदावरी नदीला महापुर येईल, पण नळाला दररोज पाणी येणार नाही. देशाच्या पंतप्रधानापासुन राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री संबंधीत विभागाच्या प्रमुखांबरोबर कोपरगावचे सामाजीक कार्यकर्ते राजेश मंटाला, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे हे कायम पाठपुरावा करीत आहेत.

माजी खासदार स्व. शंकरराव काळे, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी त्यांचे संपूर्ण जीवन पाण्यासाठी संघर्ष करण्यात घालवले, पण कोपरगावला हक्काचे पाणी काही मिळाले नाही. दिवसेंदिवस कोपरगावचे हक्काचे पाणी कमी-कमी होत गेले. तालुक्याला सिंचनाचे पाणी वेळेवर मिळत नाही त्यामुळे तालुक्यातील शेती उजाड होत चालली आहे. नागरीकांना पिण्यासाठी दररोज पाणी मिळत नसल्याने कोपरगावचे स्थानिक नागरीक दुसऱ्या शहरांमध्ये स्थलांतरीत होत असल्याचे भयावह चित्र सध्या कोपरगावचे आहे.

तालुक्यात आत्तापर्यंत अनेक मंञी, राजकीय मोठे नेते आले. विक्रमी सभा झाल्या, पण अनेक वर्षांपासून नळाला पाणी दररोज काही आले नाही. योजना अनेक आल्या त्या कागदावर पुर्ण झाल्या, पण येथील नागरीकांची तहान अपुर्णच आहे. राज्यातील इतर शहरांच्या बाजारपेठा वाढत चालल्या, पण कोपरगाव शहरातील बाजारपेठ केवळ पाण्याअभावी कमकुवत होत चालली आहे.

गढुळ पाणी पिल्याने अनेक रोगाने नागरीक ञस्त झाले आहेत. विशेषतः  पोटाचे विकार वाढलेले सर्वाधिक रुग्ण कोपरगाव मध्ये आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपण धाडशी व क्षणात निर्णय घेणारे नेते आहात कोपरगावकरांनी तुमच्या आदेशाचे अनेक वेळा पालन केले आहे. तेव्हा किमान दररोज पिण्याचे पाणी मिळेल अशी कायमस्वरूपी व्यवस्था करावी अशी मागणी नागरीकामधून होतं आहे.