बालविवाहास आळा घालणे सर्वांचे सामाजिक दायित्व – महेश डोके

शेवगाव प्रतिनिधी, दि. २१ : निरोगी, सुद्रुढ समाजासाठी बालविवाह घातक असल्याने ते होऊच नयेत यासाठी ग्रामसेवकांनी गावागावातील ग्रामसभेत ठराव संमत करून समाजाचे प्रबोधन करावे.

बालविवाह हा संवेदनाशील विषय असल्याने ग्रामसेवकांनी प्रत्येक गावात बाल संरक्षण समिती स्थापन करून या समितीच्या माध्यमातून बालकांच्या पालकांचे प्रबोधन करावे. अलीकडे बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे.

‘ उडान ‘ संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार राज्यात सुमारे २६ टक्यापर्यत बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. हे अत्यंत घातक असल्याने वाढत्या बालविवाहांना आळा घालणे आपल्या सर्वांचेच सामाजिक दायित्व असल्याचे प्रतिपादन गटविकास अधिकारी महेश डोके यांनी केले आहे.

स्नेहालय, जिल्हा महिला बाल विकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, शेवगाव पंचायत समिती आणि उचल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘उडान ‘ बालविवाह प्रतिबंध अभियानान्तर्गत येथील पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित बालविवाह प्रतिबंधक या एक दिवशीय कार्यशाळेत श्री डोके अध्यक्षपदावरून बोलत होते.

डॉक्टर मनीषा लढ्ढा म्हणाल्या, बाल वयात विवाह झालेल्या दांपत्यांचे आरोग्य बिघडते, शिवाय त्यांचे अपत्य देखील सुद्रुढ निघत नाहीत. लहान वयात कुटूंबाच्या जबाबदाऱ्या पेलतांना अकाली वृध्दत्व येते. त्याचे कुटूंबाच्या भविष्यावर दुष्परिणाम होतात.

एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी भाऊसाहेब गडदे ‘बीड जिल्हा बालविवाह बाल संरक्षण समितीचे समीर पठाण यांची ही भाषणे झाली. उडाणचे समन्वयक प्रवीण कदम यांनीबालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ आणि सुधारित कायदे विषयी सविस्तर माहिती दिली. शेवटी ग्रामसेवकाना बालविवाह रोखण्यासाठी कार्यवाही करताना येणाऱ्या अडचणी विषयी सविस्तर चर्चा करून. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नाचे निरासन केले.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संकेत लोणकर ,सहाय्यक गट विकास अधिकारी तृप्ती गाठ, सचिन खेडेकर आदी उपस्थित होते. कार्यशाळा आयोजित करण्यासाठी रामदास काकडे, विजय पाठक, अंबादास शिंदे यांनी योगदान दिले. प्रवीण कदम यांनी सूत्रसंचालन केले महेश सूर्यवंशी यांनी आभार मानले.