आपेगाव व खरडगाव येथील पुलाचे सहा कोटी रू- खर्चाचे काम होणार पूर्ण – आमदार मोनिका राजळे

शेवगाव प्रतिनिधी, दि. २१ : तालुक्यातील आपेगाव येथील पुल तसेच खरडगाव ते सुसरे रस्त्यावरील नांदणी नदी वरील पुलाचे काम मार्गी लागले आहे. शासनस्तरावरुन या पुलाच्या कामाला मान्यता देण्यात आली असून, आपेगाव येथील पुलाच्या कामासाठी अडीच कोटी रुपये तर खरडगाव येथील पुलासाठी साडेतीन कोटी रुपयांचे कामे नाबार्ड-२८ अंतर्गत होणार आहेत. अशी माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली आहे.

या प्रश्ना बाबत सार्वजानिक बांधकाम विभाग व नाबार्डच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी करुन सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. या कामास येत्या मार्च मध्ये निधी मिळून प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणे अपेक्षित आहे. संबंधित विभागाचे मंत्री तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना या भागातील नागरिकांच्या भावना, पत्रव्यवहार करुन तसेच समक्ष निवेदन देऊन पाठपुरावा केला होता.

आपेगाव येथील ढोरा नदीवर पूल नसल्याने येथील नागरिकाना व शालेय विद्यार्थ्याना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने गावकऱ्यांची मागणीची दखल घेत, शासनस्तरावर पुल व्हावा यासाठी मागील वर्षापासून प्रयत्न सुरु होते. या मागणी मध्ये आपेगाव, खरडगावसह मतदारसंघातील १८ पुलाच्या कामांची मागणी केली होती.

उर्वरित पुलांची कामे मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजानिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तसेच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचेकडे वेळोवेळी पाठपुरावा सुरु आहे.

आपेगाव पुलासाठी अडीच कोटी रुपये तर खरडगाव ते सुसरेरोड वरील नांदणी नदी वरील पुलाचे कामासाठी साडेतीन कोटी रुपयांच्या निधी मंजूर झाल्याबद्दल आमदार मोनिका राजळे यांनी वरील सर्वांचे आभार मानले.