कोपरगांव प्रतिनिधी, दि. ९ : तालुक्यातील काकडी – शिर्डी विमानतळ प्राधिकरण अस्तित्वात येऊन अनेक वर्षे झाली पण येथील प्रकल्पग्रस्त रहिवाशांसह शेतकऱ्याच्या समस्या अजुनही सुटलेल्या नाही तेव्हा विमानतळ प्राधिकरणाने काकडी परिसरातील गुंजाळवस्ती म्हसोबा वस्ती रहिवासीयांना त्यांच्या वीज रोहित्रामधून वीज द्यावी व गुंजाळवस्ती रस्ता तात्काळ दुरुस्त करावा यामागणीचे निवेदन येथील रहिवासी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी राज्य वीज वितरण कंपनी राहाता विभागाचे उप कार्यकारी अभियंता व व्यवस्थापकीय व्यवस्थापक शिर्डी काकडी विमानतळ विकास प्राधिकरणास शुक्रवारी दिले असुन माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी या प्रश्नांत लक्ष घालावे अशी निवेदनकर्त्यांची मागणी आहे.
या निवेदनात पुढे म्हटले की, काकडी परिसरात गुंजाळ वस्ती म्हसोबा वस्ती भागात असंख्य वीजग्राहक, तसेच शेतकरी असुन त्यांना सध्या संगमनेर विभागातील तळेगाव वीज रोहित्रामधून वीज जोड दिले आहे त्यात वारंवर बिघाड होऊन त्यातून सुरळीतपणे वीज मिळत नाही परिणामी नागरिकांसह जनावरांना प्यायला पाणी नाही, ज्याच्या विहीरींना पाणी आहे त्यांना ते पिकांना देता येत नाही, दैनंदिन वीजेवरील कामात खंड पडतो, आठ-आठ दिवस वीज विभागाचे कर्मचारी वीज दुरुस्तीसाठी तक्रार देऊनही येत नाही त्यामुळे याभागातील सर्व वीज ग्राहक हैराण झालेले आहे. त्यांनी राहाता वीज कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधुन शिर्डी काकडी विमानतळ प्राधिकरणाच्या वीज रोहित्रातून वीज मिळावी अशी मागणी केली आहे. या प्रकल्पग्रस्तांना प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांनी अनेक वेळा आश्वासने दिली पण त्यांनी ते पूर्ण केलेले नाही.
त्याचप्रमाणे येथील गुंजाळवस्ती काकडी या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात त्यावरून चालने मुश्कील झाले आहे, सतत अपघात होऊन त्यावरून प्रवास करणारे उपचारासाठी दवाखान्यांत भरती होत आहे, शाळकरी मुला-मुलींना दैनंदिन शिक्षण घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे,. रात्री अपरात्री दवाखान्यात गर्भवती महिलेसह अबाल वृद्ध व रुग्णांना घेऊन जाणे जिकरीचे झाले आहे, हा रस्ता प्राधिकरणाने दुरुस्त केला नाही तर सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी तसेच या भागातील रहिवासी काकडी विमानतळ प्राधिकरणासमोर मुलाबाळांसह आमरण उपोषणास बसतील असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.