हेल्पलाईन नंबरवर विद्यार्थिनींना तात्काळ मदत उपलब्ध होणार – आमदार काळे

कोपरगाव  प्रतिनिधी, दि. २७ : बदलापूर येथील शाळेत चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मतदार संघातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आ.आशुतोष काळे यांनी आपल्या संपर्क कार्यालयाचा ९८५८५५०३३३ हा हेल्पलाईन नंबर दिला आहे. त्या हेल्पलाईन नंबरवर विद्यार्थिनींना तात्काळ मदत उपलब्ध होणार असून त्यामुळे विद्यार्थिनींच्या पालकांची मोठी चिंता मिटणार आहे.

बदलापूर शाळेतील अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आ.आशुतोष काळे यांनी सोमवार (दि.२६) रोजी कोपरगाव मतदार संघातील सर्व शैक्षणिक संस्था चालक, तसेच जिल्हा परिषद शाळा व रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांची कोपरगाव येथे श्री साईबाबा तपोभूमीच्या हॉलमध्ये बैठक घेतली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करून हेल्पलाईन नंबर बाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी आ.आशुतोष काळे म्हणाले की, बदलापूर येथील घटना अत्यंत दुर्दैवी व माणुसकीला काळीमा फासणारी आहे. त्यामूळे शाळा महाविद्यालय प्रशासनाने यापुढे अधिक जागरूकपणे सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. शासनाकडून आलेल्या नवीन नियमावली अंमलात आणून अशा घटना टाळण्यासाठी योग्य खबरदारी घ्यावी. पोलिसांना सूचना करतांना त्यांनी सांगितले की, पोलिसांनी नियमितपणे शाळा महाविद्यालय, बस स्थानक तसेच गर्दीच्या ठिकाणी सिव्हील ड्रेसवर गस्त वाढवावी.

याठीकाणी अनेक रोड रोमिओ विद्यार्थिनींना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्रास देतात. त्याबाबत शिक्षण बंद होईल या भीतीपोटी विद्यार्थिनी पालकांकडे वाच्यता करीत नाही व पालक देखील तक्रार करीत नाही. त्यामुळे रोड रोमिओंची हिम्मत वाढत चालली असून त्या रोड रोमिओंचा कायमचा बंदोबस्त करा. शाळा महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींना शाळा महाविद्यालय सुटल्यानंतर वेळेत घरी पोहोचण्यासाठी वेळेवर कोपरगाव आगार प्रमुखांनी बस उपलब्ध करून देण्यासाठी योग्य नियोजन करावे.

मतदार संघातील ज्या विद्यार्थिनींना मदत आवश्यक असल्यास त्यांना व त्यांच्या पालकांना आवश्यक मदत मिळण्यासाठी आपल्या शाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनींना ९८५८५५०३३३ या संपर्क क्रमांकावर संपर्क करण्यासाठी हा नंबर द्यावा असे आवाहन करून त्यांना आवश्यक मदत तात्काळ उपलब्ध होईल अशी ग्वाही दिली.

यावेळी कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान माथुरे, कोपरगाव ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र महाजन, नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, पंचायत समिती महिला व बालकल्याण अधिकारी पंडित वाघिरे, गटशिक्षण अधिकारी शबाना शेख, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य कारभारी आगवण, पद्माकांत कुदळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण, संचालक सुधाकर रोहोम, दिलीप बोरनारे, सचिन चांदगुडे, माजी संचालक बाळासाहेब बारहाते, नंदकिशोर औताडे, राजेंद्र औताडे, ज्ञानेश्वर गव्हाणे तसेच  मतदार संघातील शाळा-महाविद्यालयांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक व प्राचार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थिनींना प्रत्येक संकटाचा सामना करता यावा व निर्भयपणे समाजात ताट मानेने जगता यावे संकटकाळी स्वत:चे संरक्षण देखील करता यावे त्यासाठी काय केले पाहिजे याचे धडे देण्यासाठी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाने पुढाकार घेतला आहे. मंडळाच्या अध्यक्षा गौतम बँकेच्या माजी संचालिका सौ. पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविले जाणार आहे. ज्या शाळा महाविद्यालयांना आपल्या विद्यार्थिनींसाठी हि कार्यशाळा आयोजित करावयाची आहे त्यांनी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाशी संपर्क करावा. – आ.आशुतोष काळे.