शेवगावमध्ये धार्मिक झेंड्वयारून वाद, शासनाची वेळीच कारवाई

शेवगाव प्रतिनिधी, दि. २३ :  साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला अक्षय्य तृतीया व रमजान ईद हे दोन्ही उत्सव  शनिवारी ( दि२२ ) तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरे झाले. तर शेवगावात सायंकाळी उशिरा गेल्या काही दिवसात विविध जयंती, धार्मिक उत्सवा निमित्त लावण्यात आलेल्या झेंड्यामुळे निर्माण झालेला काहीसा तणाव पोलिस प्रशासनाने वेळीच केलेल्या कारवाईमुळे निवळला.पोलीस निरीक्षक विलास पुजारी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी राज्य राखीव दलाच्या तुकड्या व पोलिस बंदोबस्तात चौकातील सर्वच झेंडे काढून टाकले.

शेवगावातील सर्वच चौकात व नेवासे, नगर , पैठण  आणि बाजारपेठेतील रस्त्याच्या कडेला वेळोवेळी लावण्यात आलेले विविध रंगाचे झेंडे तसेच होते. त्याबद्दल अनेकांची नाराजी होती. दरम्यान तालुक्यातील दहिफळ येथे झालेल्या किरकोळ वादातून तेथे जातीय तणाव निर्माण झाला होता. त्या संदर्भातील तक्रार देण्यासाठी तेथील लोक पोलीस ठाण्यात आले असता शहरातील दुसरा जमाव अनधिकृत झेंडे काढून टाकण्यासाठी याचवेळी पोलीस ठाण्यात आला.

एकाच वेळी दोन समाजाचा जमाव समोरासमोर आल्याने एकमेकात गैरसमजुकीतून तणाव निर्माण झाला. थोडी घोषणाबाजी झाली. रमजान ईद व अक्षय तृतीया असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने राज्य राखीव दलाची व पाथर्डी व नेवासे येथून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त बोलावून सर्वच झेंडे काढून टाकण्याची कारवाई केली.

यावेळी तहसीलदार छगनराव वाघ, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप  मिटके, पोनि. विलास पुजारी स. पो. नि. विश्वास पावरा, आशिष शेळके महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे तसेच नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने   सर्व झेंडे उतरून घेतले.  क्रान्ती चौकात झेंड्यासाठी उभे केलेले पोल देखील यावेळी काढण्यात आले.

नागरिकांनी धार्मिक सण,  उत्सव, जयंती व पुण्यतिथी सार्वजनिक पद्धतीने  साजऱ्या करताना इतर समाजाच्या भावना दुखावणार नाही याची दक्षता घ्यावी. या उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुका,   लावण्यात येणारे झेंडे, फलक अधिकृत परवानगी शिवाय लावू नयेत. अन्यथा संबंधित आयोजकावर गुन्हे दाखल करण्यात येतील.
        – संदीप मिटके उपविभागीय पोलीस अधिकारी