कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : राज्यातील हॉकीची पंढरी समजल्या जाणाऱ्या गौतम पब्लिक स्कूलच्या ऐतिहासिक हॉकी मैदानावर राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचे महान हॉकी खेळाडू भारतरत्न मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. त्याचे औचित्य साधत संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गौतम पब्लिक स्कूल व जिल्हा क्रीडा अधिकारी, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य जिल्हास्तरीय जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य नूर शेख यांच्या हस्ते करण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील मुला-मुलींचे एकूण बारा मातब्बर संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. उद्घाटन प्रसंगी बोलतांना प्राचार्य नूर शेख यांनी मेजर ध्यानचंद यांच्या पत्नी जानकीदेवी यांनी स्वतः खेळाडू म्हणून प्राचार्य नूर शेख यांच्याशी सन १९८३ मध्ये सामन्यादरम्यान केलेला सुसंवाद आणि त्यांनी प्राचार्य नूर शेख यांचे खेळाडू म्हणून केलेले कौतुक याबद्दलच्या आठवणींना उजाळा देऊन उपस्थित सर्व खेळाडूंना प्रेरित केले.
उदघाटन प्रसंगी उपस्थित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे विशाल गर्जे यांचा सन्मान क्रीडा संचालक सुधाकर निलक यांच्या हस्ते करण्यात आला. राष्ट्रीय क्रीडादिनी स्पर्धेसाठी उपस्थित सर्व प्रशिक्षक, मार्गदर्शक यांचाही सन्मान गौतम पब्लिक स्कूलच्या वतीने करण्यात आला. स्पर्धेचे बक्षीस वितरण संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते पार पडणार असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संचालक सुधाकर निलक, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, फुटबॉल प्रशिक्षक राजेंद्र आढाव, क्रिकेट प्रशिक्षक इसाक सय्यद काम पाहत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले.