कोल्हे कारखान्याला सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार प्रदान 

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१४ : सहकार क्षेत्रात साखर उद्योगात सातत्याने नाविन्यपुर्ण प्रयोग करून उत्पादनांत सातत्य ठेवल्याबद्दल सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांस नॅशनल शुगर इन्स्टीटयुट कानपुरच्यावतीने राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट पुरस्कार अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे मुख्य सचिव संजीव चोपडा व नॅशनल शुगर इन्स्टीटयूटचे संचालक नरेंद्र मोहन यांच्या हस्ते संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व संचालक मंडळास हा पुरस्कार लखनौ येथे नुकताच प्रदान करण्यात आला.

कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक कोल्हे व बिपीन कोल्हे यांनी सदरचा पुरस्कार संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे व सभासद शेतक-यांना अर्पण केला. ११ व १२ ऑक्टोंबर रोजी लखनौ येथे नॅशनल शुगर इन्स्टीटयुट कानपुरच्यावतीने दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील साखर उद्योगासंदर्भात परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे, संचालक सर्वश्री, ज्ञानेश्वर परजणे, बापूसाहेब बारहाते, बाळासाहेब वक्ते, रमेश आभाळे, रमेश घोडेराव, राजेंद्र कोळपे, ज्ञानेश्वर होन, विलास माळी, सतिष आव्हाड, बाळासाहेब पानगव्हाणे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव जी. सुतार, उत्पादन प्रमुख विवेक शुक्ला, कार्मिक अधिकारी (वर्क्स मॅनेजर) विश्वनाथ भिसे आदि उपस्थित होते.

बिपीन कोल्हे याप्रसंगी बोलताना म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी देश विदेशातील साखर उद्योगाचा अभ्यास करून येथील साखर उद्योगात आधुनिकीकरणाला विशेष महत्व देत अमुलाग्र बदल घडवुन आणले. बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत सहकारी साखर कारखानदारीवर अवलंबुन असणारा शेतकरी सभासद व अन्य घटकांची आर्थिक क्रयशक्ती कशी वाढेल यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. त्यांच्यामुळेच सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांस राष्ट्रीय व राज्य स्तरावरील असंख्य पुरस्कार मिळालेले आहेत.

विवेक कोल्हे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, नॅशनल शुगर इन्स्टीटयुट कानपूर व्यवस्थापनाने आमचा जो सन्मान केला तो अलौकीक आहे, तसेच राष्ट्रीय स्तरावर भारत सरकारच्यावतीने देण्यात आलेला सहकारी साखर कारखानदारीतील एकमेव पुरस्कार असुन संस्थेवर सर्व सभासदांनी केलेल्या विश्वासाचे प्रतिक असल्याचे सांगितले. तसेच भविष्यातही सहकारी साखर कारखानदारीत आपला सहकारी साखर कारखाना उत्तरोत्तर प्रगती पथावर राहून आर्थिक दैदिप्यमान शिखरे गाठण्यासाठी सर्व सभासद बंधू भगिनी व कारखान्याच्या सर्व घटकांच्या सहाय्याने कार्यरत राहू असे शेवटी म्हणाले.