शिक्षक ज्ञानदानाच्या माध्यमातून राष्ट्रउभारणीचे काम करतात – मृदुला भारदे

शेवगाव प्रतिनीधी, दि. ३० : शिक्षक वृंद ज्ञानदान व संस्काराच्या माध्यमातून राष्ट्रउभारणीचे काम करतात. त्यांच्या ज्ञानदान व संस्कारामुळे अनेक विद्यार्थ्यांना  विविध क्षेत्रात उच्च पदावर जाण्याची संधी मिळत असते असे प्रतिपादन राज्याच्या मृद व जलसंधारण विभागाच्या उपसचिव मृदुला भारदे – देशपांडे यांनी केले.

शेवगाव रोटरी क्लबच्या वतीने  रविवारी ( दि.२९ ) सायंकाळी  ‘नेशन बिल्डर ‘ ( राष्ट्रबांधणी शिल्पकार ) हा पुरस्कार देऊन तालुक्यातील सहा स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक, शाल व श्रीफळ देऊन नाशिकचे उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.

उपसचिव भारदे -देशपांडे यांनी, येथील सुर्यकांता नदीचे रूंदीकरण व खोलीकरणाच्या कामासाठी डॉ. गणेश चेके यांच्यासह रोटरी क्लबने पुढाकार घेऊन चांगले काम केले. याचा मला आनंद आहे. असे सांगून अन्यत्रही  जलसंधारणाचे कामाची मागणी आल्यास सामाजिक संस्थांना आपण निश्चित सहकार्य करू अशी ग्वाही दिली.

यावेळी रोटरीचे अध्यक्ष प्रा. डॉ.काकासाहेब लांडे, सचिव मोहमंद वसीम, रमेश भारदे, रागिणी भारदे,  संतोष ढाकणे, डॉ. गणेश चेके, आशिष लाहोटी, अण्णासाहेब दिघे, प्रदिप बोरूडे, अशोक लबडे आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक राधेश्याम तिवारी होते. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या संतोष पवार ( सुकळी ), मुकूंद शेळके ( तळणी ), अशोक घुले ( वरूर बु.), गवाजी बळीद ( चापडगाव ), राजू साळवे (  बाडगव्हाण ), गणेश डमाळ ( एरंडगाव ) यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

उपजिल्हाधिकारी भारदे  म्हणाले, शिक्षकांची विश्वासार्हता असल्यानेच शिक्षकांना अनेक कामे दिली जातात. असे असतानाही शिक्षक ज्ञानदानाच्या कामात झोकून देऊन काम करतात, हे खरेच कौतुकास्पद आहे. पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा राऊळ, डॉ. शंकर गाडेकर आदींनी अभिनंदन केले. सूत्रसंचालन निलेश मोरे यांनी केले. प्रास्ताविक रोटरीचे अध्यक्ष काकासाहेब लांडे यांनी केले. तर आभार सचिव मोहमंद वसिम यांनी मानले.