ठरल्याप्रमाणे होणार लोकशाहीर साठे पुतळा अनावरण सोहळा – नितीन साबळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ : विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण पुन्हा लांबणीवर पडू शकते. अगोदरच पुतळ्याचे अनावरण न झाल्यामुळे समाजात मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. समाज बांधव व अण्णाभाऊ साठे प्रेमींची मागणी लक्षात घेवून आ.आशुतोष काळे यांनी शासकीय पद्धतीने अनावरण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिनभाऊ साठे सोमवार (दि.०७) रोजी अनावरण सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असून आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होणार आहे.

मात्र ज्यांची श्रेय घेण्यासाठी धडपड सुरु आहे त्यांनी कितीही विरोध केला तरी अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिनभाऊ साठे यांच्या हस्तेच साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळेत आणि ठरल्याप्रमाणे होणार असल्याचे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे सचिव नितीन साबळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

प्रसिद्धी पत्रकात नितीन साबळे यांनी पुढे असे म्हटले आहे की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिनभाऊ साठे येणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकप्रतिनिधी या नात्याने आ.आशुतोष काळे उपस्थित राहणार आहेत. कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने या कार्यक्रमाची सर्व तयारी करण्यात आली आहे.

विरोधकांनी आपल्याला श्रेय मिळणार नसल्यामुळे या पुतळ्याचे अनावरण आजवर होऊ दिले नाही व पुन्हा एकदा श्रेय वादासाठी पुतळ्याचे अनावरण होवू नये यासाठी प्रसार माध्यमांमध्ये चुकीचे वक्तव्य करून या सोहळयाच्या कार्यक्रमाला अडचणी आणण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र ज्या महापुरुषाने आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी व्यतीत केलं, ज्यांनी आपल्याला एवढे मोठे साहित्य भांडार दिले. ज्यांच्या साहित्याचा परदेशात अभ्यास सुरु आहे अशा महान व्यक्तीच्या पुतळा अनावरणात श्रेय घेण्यासाठी वाद निर्माण करणे हे कोणाही अण्णाभाऊ साठे प्रेमींना व समाजाला आवडणार नाही.

आजवर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण व्हावे यासाठी संघटना कार्यकर्ते यांनी उपोषण केली, आंदोलन केली, मोर्चे पण निघाले परंतु अनावरणासाठी यश मिळाले नाही. दोन दिवसापूर्वी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे शासकीय पद्धतीने अनावरण व्हावे व इतर मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांना आ.आशुतोष काळे व मा. नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांनी ग्वाही देवून आण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिनभाऊ साठे यांच्या हस्ते शासकीय पद्धतीने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सर्व तयारी अंतिम टप्प्यात असून विरोधकांनी श्रेय घेण्यासाठी कितीही विरोध केला तरी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम ठरल्याप्रमाणे होणारच. अण्णाभाऊ साठे प्रेमींनी व समाज बांधवांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे नितीन साबळे यांनी शेवटी म्हटले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब ज्या ज्यावेळी कोपरगावच्या दौऱ्यावर आले. त्या त्यावेळी आ.आशुतोष काळे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेला सूचना दिल्या होत्या. मात्र त्या त्यावेळी विरोधकांनी आपल्याला श्रेय मिळणार नाही या भीतीपोटी या अनावरण कार्यक्रमाला विरोध दर्शविला आहे. परंतु सोमवार (दि.०७) रोजी अनावरण कार्यक्रम स्वत:अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिनभाऊ साठे यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे कुणाच्या पोटात दुखायचे काहीच कारण नाही.  – नितीन साबळे (सचिव-लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळा स्मारक समिती)