आमदार काळेंनी केलेला विकास लक्षवेधी – अशोक रोहमारे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ५ : आमदार आशुतोष काळेंनी पाच वर्षांत मतदार संघात केलेला विकास लक्ष वेधणारा आहे. मतदार संघातील रस्ते, वीज, पाणी, आरोग्य आदी प्रश्न या पाच वर्षात निकाली काढून  विकासाचे बहुतांश प्रश्न मार्गी लावले आहेत. विकासाच्या या प्रश्नाबरोबरच आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघातील विविध देवस्थानांच्या विकासाचे प्रश्न सोडविण्याची किमया  करून दाखविली असल्याचे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे यांनी सांगितले.

कोपरगाव विधानसभा मतदार संघात  उमेदवारांनी  निवडणुकीच्या प्रचाराचा  वेग वाढवला आहे.  आमदार काळे यांच्या प्रचारार्थ पोहेगावमध्ये कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या भेटीगाठी घेत प्रचाराचा जोर वाढविला आहे. आ. आशुतोष काळेंच्या प्रचारार्थ पोहेगावमध्ये अशोकराव रोहमारे यांनी घोंगडी बैठका घेवून नागरिकांना मतदार संघाच्या झालेल्या विकासाबाबत नागरिकांशी संवाद साधला.

ते म्हणाले,  कोपरगाव तालुक्याला प्राचीन काळापासून पौराणिक व ऐतिहासिक वारसा लाभला आहे. तालुक्यात  विविध धार्मिक देवस्थाने असंख्य भाविकांची श्रद्धास्थाने आहेत. या धार्मिक स्थळांचा विकास होवून सोयी सुविधा मिळाव्यात अशी भाविकांची मागणी होती. धार्मिक स्थळांची वाढती लोकप्रियता त्यामुळे याठिकाणी भाविकांचा सुरु असलेला नियमित ओघ यामुळे या देवस्थानांचा विकास होणे गरजेचे असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी जाणले होते.

त्यामुळे कोपरगाव मतदार संघाच्या विकासाबरोबरच सर्वच तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून विविध देवस्थानांना ‘क’ वर्ग दर्जा मिळवून देत जवळपास ११ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मिळवून दिला आहे. या माध्यमातून कोपरगावचा पौराणिक, धार्मिक वारसा जपला  जाणार आहे.

या देवस्थानांमध्ये श्री मयुरेश्वर देवस्थान पोहेगाव, श्री भैरवनाथ जोगेश्वरी देवस्थान चांदेकसारे, श्री. रामेश्वर देवस्थान वारी, श्री.अमृतेश्वर देवस्थान माहेगाव देशमुख, श्री खंडोबा देवस्थान वाकडी, श्री चांगदेव महाराज देवस्थान पुणतांबा, श्री. जगदंबा माता देवस्थान ब्राह्मणगाव, श्री. दत्तपार कोपरगाव, श्री दत्त मंदिर माहेगाव देशमुख, श्री नरसिंह महाराज देवस्थान कान्हेगाव, श्री.महेश्वर देवस्थान कोळपेवाडी, श्री राघवेश्वर देवस्थान कुंभारी, श्री लक्ष्मी माता देवस्थान कोकमठाण, श्री शुक्लेश्वर मंदिर कोपरगाव, श्री सिद्धेश्वर देवस्थान मंजूर, तसेच ऐतिहासिक राघोबादादा वाड्याच्या संवर्धनासाठी निधी देवून या देवस्थानांचा विकास साधला असून तो देखील एकाच पंचवार्षिकमध्ये हे विशेष.  

मतदार संघाचा विकास होवून सर्वच देवस्थानांचा विकास झाल्यामुळे भाविकांची अलौकिक श्रद्धा असलेल्या या देवस्थानांच्या ठिकाणी भाविकांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा मिळणार आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत निश्चितपणे वाढ होवून धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे यांनी नागरिकांशी संवाद साधतांना सांगितले.