कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३ : नामदेव धोंडो उर्फ ना. धों. महानोर यांचा राजकारण, समाजकारण, शेती आणि पाणी या विषयात प्रचंड दबदबा होता त्यांच्या निधनाने आपण शेती, पाण्याची ओढ असलेला साहित्यिक गमावला अशा शब्दात जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी संजीवनी उद्योग समूह, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे वतीने श्रद्धांजली वाहिली.
ते पुढे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे आणि निसर्ग कवी, साहित्यिक, विधान परिषदेचे माजी आमदार नामदेव धोंडो महानोर यांचे अतूट संबंध होते. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे पाणी. त्यात स्व. शंकरराव कोल्हे व महानोर यांचे विचार एकमेकांशी जुळले होते.
पाट पाण्याच्या तसेच मराठवाड्याच्या विविध प्रश्नाविषयी त्यांच्यात नेहमी चर्चा होत असे. पहिले जल साहित्य संमेलन त्यांनी नागपुरात भरवले होते. त्यांच्या कारकिर्दीचा गौरव पद्मश्री पुरस्काराने करण्यात आला होता. शेतकऱ्यांचे प्रश्न नामदेव धोंडो महानोर यांनी पोटतिडकीने विधिमंडळात मांडून त्याच्या सोडवणुकीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले.