कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : मतदार संघातील जनतेला अपेक्षित असलेला सर्वांगीण विकास तर करायचाच परंतु त्याच बरोबर जनतेचे आरोग्य कसे अबाधित राहील यासाठी कोपरगाव शहरात आ.आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून आकाराला येत असलेले उपजिल्हा रुग्णालय मतदार संघातील जनतेच्या आरोग्यासाठी वरदान ठरणार असल्याचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव यांनी म्हटले आहे.
कोपरगाव शहरातील प्रभाग क्र.१३ मध्ये कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आ. आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव म्हणाले की, सर्वसामान्य जनतेसाठी रस्ते, वीज, पाणी या सुविधा अत्यंत महत्वाच्या असल्यामुळे या पाच वर्षात हे मुलभूत प्रश्न मार्गी लागले आहेत त्याचबरोबर आ. आशुतोष काळे यांनी जनतेच्या आरोग्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाची वचनपूर्ती करून अत्यंत महत्वाचा प्रश्न मार्गी लावला आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघापासून अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालय जवळपास १०० किलोमीटर अंतरावर आहे.
उत्तर नगर जिल्ह्यात दुसरे उपजिल्हा रुग्णालय नाही. त्यामुळे मतदार संघातील नागरिकांना गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी अहिल्यानगर येथे जाणे शक्य नाही.त्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत असल्यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणी वाढत होत्या. याची जाणीव असणाऱ्या आ.आशुतोष काळे यांनी गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांना सर्वच आजारांवर वेळेत उपचार उपलब्ध व्हावे यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळविला असून त्याचे काम सध्या प्रगती पथावर आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आ.आशुतोष काळे यांनी मतदार संघातील नागरिकांना कोपरगावमध्ये उपजिल्हा रुग्णालय उभारण्याचे दिलेले वचन पूर्ण केले हि मतदार संघातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत समाधानाची गोष्ट आहे. १०० बेडच्या या उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांना चांगल्या प्रकारे आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहे. उपजिल्हा रुग्णालयात तज्ञ डॉक्टर्स कायमस्वरूपी उपलब्ध राहतील. अतिदक्षता विभाग असल्यामुळे अंत्यवस्थ रुग्णांना पुढील उपचारासाठी इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही.
सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा कोपरगाव मतदार संघातील नागरिकांना एकाच ठिकाणी मिळण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर मतदार संघाच्या ग्रामीण भागाचा देखील आरोग्याचा प्रश्न सोडवितांना माहेगाव देशमुखसह कोळपेवाडी, कोळगाव थडी सुरेगाव, शहाजापूर मळेगाव थडी, कुंभारी, धारणगाव, हिंगणी, मुर्शतपूर, सोनारी आदी गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले आहे.
तसेच संवत्सर येथील ३० बेडचे ग्रामीण रुग्णालय, कर्मचारी निवासस्थान, पोहेगाव येथे ३० बेडचे ग्रामीण रुग्णालय, चासनळीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे नूतनीकरण, तिळवणी प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी, मढी बु.प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजुरी,ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, तसेच कोपरगाव शहरात आरोग्यवर्धिनी सेंटर उभारून नागरिकांच्या आरोग्याची काळजी दूर केली आहे. मतदार संघात विकासाचा डोंगर उभा करून भविष्यात त्यांना मतदार संघाच्या विकास करण्यासाठी अधिकची प्रेरणा मिळावी यासाठी आ. आशुतोष काळे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव यांनी यावेळी केले.