शेवगाव प्रतिनिधी, दि. २४ : केंद्रात व राज्यात असलेली सत्ता आणि भक्कम नेतृत्वामुळे येथील अनेकांना सत्तेचे डोहाळे लागणे स्वाभाविक असल्याने शेवगाव पाथर्डी २२२ मतदारसंघात भारतीय जनता पार्टी अंतर्गत तिकीट वाटपाच्या अगोदर पासून विद्यमान आमदार मोनिकाताई राजळे यांना विरोध झाला. मात्र भाजपच्या श्रेष्ठींनी पहिल्याच यादीत आमदार राजळे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन विश्वास व्यक्त केला. हीच त्यांच्या विजयाची नांदी ठरली. पक्षाने टाकलेला विश्वास राजळे यांनी सार्थ ठरवत विजयाची हॅट्रिक साधली. त्यांनी आपले नजीकचे महाआघाडीचे स्पर्धक ॲड. प्रताप ढाकणे यांच्यापेक्षा तब्बल १९ हजार ४३ मताधिक्य घेऊन विजय मिळविला.
प्रारंभी बहुरंगी वाटणारी ही लढत शेवटी तिरंगी झाली. अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले पाटील हे त्यांच्या होमपीच असलेल्या शेवगाव तालुक्याच्या गावात तेराव्या फेरीपर्यंत आघाडीवर असले तरी त्यानंतर त्यांची मते घटत गेली. तसेच शेवगावच्या अपक्ष उमेदवार हर्षदा काकडे यांना १२ हजार २३२ वर तर वंचित बहुजन आघाडीचे प्रा. किसन चव्हाण यांना ४ हजार ४३७ मतावर तर या व्यतिरिक्त उर्वरित उमेदवारा पैकी फक्त एकास चार आकडी तर बाकी अन्य सर्व उमेदवारांना तीन आकडी मतावर समाधान मानावे लागले.
आमदार मोनिकाताई राजळे या गेली दहा वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. या काळात केलेल्या विकास कामांचा डोंगर जनतेसमोर मांडत लाडकी बहीण व इतर वैयक्तिक लाभाच्या योजनांचा प्रचार करत राजळे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर कधीही टीका केली नाही. त्यांच्या शांत संयमी स्वभावामुळे त्यांनी काही झाले तरी कोणालाही अपशब्दाने दुखावले नाहीं. केंद्र आणि राज्याच्या विविध योजना तनमन धनाने शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी अत्यंत हिरीरीने प्रयत्न केले.
याच काळात शेवटच्या टप्प्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेला त्यांनी अतिशय जबाबदारीने घेत मतदार संघात तब्बल एक लाख २३ हजार लाडक्या बहिणींना आपलेसे करून घेतले. पक्षाने शेतकरी वर्गाला वीज बिल माफीचा तर सर्वसामान्यांना वयोश्री व एसटीच्या प्रवासात दिलेल्या सवलतीमुळे महायुती बद्दल सहानुभूती निर्माण झाली. निवडणूक काळात माजी खासदार प्रीतम मुंडे तसेच पक्षाच्या स्टार प्रचारक ज्येष्ठ नेत्या पंकजा मुडे व ज्येष्ट नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभेने मतदारांना भारावून टाकले. त्याचा लाभ महायुतीच्या राजळे यांना निश्चीत झाला.
तसेच महाआघाडीचे उमेदवार ॲड. ढाकणे व बंडखोर अपक्ष उमेदवार घुले यांच्यात झालेल्या मत विभागणीचा फायदा राजळे यांना झाला. त्यामुळे गेल्या निवडणुकीपेक्षा त्यांनी आठ हजार अधिक मताधिक्य मिळवत आपल्या विजयावर मोहर उमटवली.
तर प्रतिस्पर्धी लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला विजय मिळाला या धुंदीत राहिल्याने आघाडीचे ढाकणे काहीसे विजय आपलाच आहे या समजूतीत राहिले. त्यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीच एकमेव सभा होऊ शकली. त्यामुळे वातावरण निर्मितीसाठी ते कमी पडले. याच काळात भाजपमधील अनेक नाराज मंडळींनी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश केला तर काहींनी बाहेरून छुपा पाठिंबा दिला. हे वास्तव असले तरी देखील त्याचा मत परिवर्तनात लाभ होऊ शकला नाही ही वस्तुस्थिती आहे.
अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले पाटील हे तसे सक्षम उमेदवार असले तरी गेल्याअनेक दिवसात त्यांचा मतदाराशी म्हणावा इतका संपर्क राहिला नव्हता. राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाशी असलेली नाळ त्यांनी जपली नाही. त्यातच शेवटपर्यंत कोणत्याही पक्षाची ठाम भूमिका घेतली नाही. त्यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कमळाचा प्रचार केला.
ही धरसोड भूमिका देखील मतदारांना भावली नाही. त्यातच त्यांना पक्षीय उमेदवारी मिळवता आली नाही त्यामुळे कोणताही पक्ष म्हणून त्यांची असणारी मते त्यांना मिळाली नाहीत. तसेच शेवगावातील प्रचारात आपला माणूस, आपल्या तालुक्याचा माणूस आमदार हवा अशा पद्धतीने केलेला प्रचार पाथर्डी करांना रुचला नाही. अशा विविध कारणामुळे रणनितीत भाऊचा खटका माहिर असला तरी निष्प्रभ ठरला.