कोपरगांव प्रतिनिधी, दि. २६ : घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अखंडप्राय भारत देशासाठी संविधान दिले त्या घटनेचे अमृतमहोत्सवी वर्ष आपण साजरे करत असुन देशातील सर्व न्यायालये, शाळा, महाविद्यालये, विविध शासकीय कार्यालयामध्ये संविधान उद्देशिकाची कोनशिला उभारण्यांत यावी अशी मागणी कोपरगांव तालुका वकील संघाचे माजी उपाध्यक्ष विधीज्ञ गणेश भिमराज मोकळ यांनी केली. या कोनशिलेमुळे येणा-या प्रत्येक पिढीला त्याचे महत्व समजेल असे ते म्हणाले.
कोपरगांव वकील संघात अध्यक्ष विधीज्ञ अशोक वहाडणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय संविधान दिन मंगळवारी साजरा करण्यांत आला त्याप्रसंगी ते बोलत होते. विधीज्ञ गणेश मोकळ पुढे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमुर्ती धनंजय चंद्रचुड यांच्याकडेही आपण ही मागणी केलेली आहे.
संविधान म्हणजे स्वातंत्र, समता, बंधुता आणि न्याय या मुल्यांप्रती देशातील प्रत्येक नागरिकामध्ये कर्तव्याची भावना जागृत करणारा दिवस होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहीलेली भारतीय राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्विकारण्यांत आली व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी २६ नोव्हेंबर १९५० पासुन सुरू झाली. संविधान हा ग्रंथ नसुन देश आहे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी विधीज्ञ एस. एम. वाघ, जयंत जोशी, एम. एस. खिलारी, ए. डी. टूपके आदि पदाधिकारीसह महिला विधीज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.