ऊस दरासंदर्भात अखेर शेतकरी संघटनेचा रास्ता रोको

शेवगाव प्रतिनिधी, दि. १४ : शेतकरी संघटनेच्या मागणी नुसार शुक्रवारी ऊस दरा संदर्भात साखर कारखानदार व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्यात शेवगाव तहसील कार्यालयात होणारी नियोजित समन्वय बैठक समन्वयाच्याच अभावामुळे होऊ शकली नाही. त्यामुळे शेतकरी संघटनेचे संतप्त कार्यकर्ते सोमवारी दिनांक १६ च्या आंदोलनावर ठाम राहिले आहेत.

उसाचा गळीत हंगाम सुरू होऊन महिना लोटला तरी, साखर कारखानदारांनी चालू गळीत हंगामातील उसाचे दर जाहीर न केल्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक होत त्यांनी शेवगाव तहसीलदार यांना शेतकरी संघटनेच्या मागणीनुसार साखर कारखानदार व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती.

त्यानुसार प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी शेतकरी संघटना व साखर कारखानदार यांची संयुक्त समन्वय  बैठक शेवगाव तहसील कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली होती. मात्र शुक्रवारी या बैठकीस  साखर कारखानदाराचे
कोणी प्रतिनिधी हजर नसल्यामुळे ही बैठक निष्फळ ठरली. यासंदर्भात  साखर कारखानदारांना तहसील कार्यालयाकडून या बैठकीचे निमंत्रणाची पत्रेच देण्यात आली नसल्याचे उघडकीस आले. असे शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

तसेच या बैठकीबाबत साखर सहसंचालक कार्यालयालाही कोणताही पत्रव्यवहार केला नसल्यामुळे  त्यांचेही प्रतिनिधी हजर नव्हते. यासंदर्भात  शेवगाव तहसील कार्यालयाचा गलथान कारभार यास कारणीभूत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे यांनी यावेळी म्हटले.

त्यामुळे शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेवगाव तहसील कार्यालयात ठिय्या मांडत मोठी घोषणाबाजी केली. शेतकरी संघटनेचे छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे यांनी प्रशासनाच्या निषेधाचा ठराव मांडल्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी त्याला अनुमती  दिली. त्यानंतर  संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेवगाव पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांचीही  भेट घेऊन १६ तारखेपर्यंत
शेतकरी संघटना व साखर कारखानदार यांची बैठक न लागल्यास १६ तारखेला ‘ रास्ता रोको’ आंदोलन करण्याचे नागरे यांना सांगितले. त्यानंतर पोलीस निरीक्षक नागरे यांनी तुमची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल. त्यामुळे आपण रास्ता रोको करू नये अशी विनंती केली.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, छत्रपती संभाजी नगरचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे, अहिल्यादेवी जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, ज्येष्ठ शेतकरी नेते मच्छिंद्र आर्ले, ताराचंद लोढे,  शेवगाव तालुका अध्यक्ष अशोक भोसले मेजर , तालुका उपाध्यक्ष अमोल देवढे, पाथर्डी तालुका अध्यक्ष बाळासाहेब गर्जे, प्रशांत भराट, हरिभाऊ कबाडी, विकास साबळे, प्रगतशील शेतकरी ढोले , शेषराव अपशेटे, हरिभाऊ काळे, यांचे सह पदाधिकारी  मोठ्या संख्येने  उपस्थित होते. 

Leave a Reply