नायलॉन मांजा न विकण्याचे ढाकणे यांची दुकानदारांना गुलाब पुष्प देत विनंती

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ : येत्या काही दिवसावर मकर संक्राती हा सण येऊन ठेपला असून या पर्वकाळात कोपरगावातील दोरा विक्रेत्यांनी नायलॉन मांजा विक्री न करण्याचे आवाहन निसर्गप्रेमी आदिनाथ ढाकणे यांनी कोपरगाव शहरातील दोरा विक्रेत्यांना गुलाब पुष्प देत हात जोडून विनंती करत केले आहे.

या विषयी निसर्गप्रेमी आदिनाथ ढाकणे यांनी सविस्तर सांगितले की, अवघ्या काही दिवसांवर लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा असा मकर संक्रांतीचा सण आला असून या सणाच्या पार्श्वभूमीवर आकाशात मोठ्या संख्येने कागदी पतंग आताच दिसायला लागले आहे, परंतु हे पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येत असलेला मांजा किंवा नायलॉन दोरा हा मनुष्याला व  निसर्गाला देखील अत्यंत घातक असून या दोऱ्यामुळे अनेक ठिकाणी मनुष्य, पशु,पक्षांना इजा झाल्या आहे तर काहींना प्राण देखील गमवावे लागले आहे.

तसेच अनेक लहान-मोठ्या झाडांना इजा होऊन त्यांची पान गळती होऊन ती जीर्ण होत चालली आहे तर नदी तलाव तळ्यामध्ये हा दोरा गेला तर त्यातील जलचर प्राण्यांना देखील या दोऱ्यापासून हानी होत आहे. त्यामुळे अशा घातक दोऱ्या पासून पतंग प्रेमींनी दूर रहावे तर आपल्या रोजी रोटीसाठी पतंग दोरा विक्री करणाऱ्या व्यवसायिकांनी देखील निसर्गाला घातक असलेला हा मांजा दोरा दोन पैशाच्या लाभासाठी विक्री करू नये असे आवाहन कोपरगाव येथील गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा निसर्गप्रेमी आदिनाथ ढाकणे यांनी कोपरगाव शहरातील मांजा पतंग विक्री करणाऱ्या दुकानदारांना गुलाब पुष्प भेट देत हात जोडून विनंती करत केले आहे. तर गावातील अनेक दुकानदारांनी ढाकणे यांना निसर्गाला घातक घातलेला मांजा दोरा विकणार नसल्याचे वचन दिले आहे.

Leave a Reply