वक्फ बोर्डाने जमिनीवर दावा ठोकल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १९ : तालुक्यातील मंजूर गावातील सरकारी जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा सांगितल्याची बाब समोर आल्याने ग्रामस्थांना धक्का बसला आहे. याकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन वक्फ बोर्डाने दाखल केलेला दावा रदद करण्यात यावा यासाठी ग्रामस्थानी १३ डिसेंबर २०२४ रोजी विशेष ग्रामसभा घेऊन नोंदणी रद्द करण्याबाबतचा ठराव घेण्यात आला आहे. 

  मंजूर येथील सरकारी जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा दाखल केल्यामुळे गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे कृत्य करण्यासाठी बाहेरील शक्तीचा आधार घेऊन विनाकारण वाद निर्माण केला आहे. 

मंजूर येथील गावात पुर्वी पासून वक्फ बोर्डाची कोणतीही जमीन नाही. ज्या जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा सांगितला ती मुळातच सरकारी जमीन आहे. दरगाह व कब्रस्तानासाठी अवश्यक असलेल्या जमीनीबाबत मंजुर ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थाशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता हा परस्पर निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे बोर्डाने दाखल केलेला दावा हा पुर्णतः खोटा आहे., त्याला मागचा पुढचा काहीच संबंध नाही.

यामुळे भविष्यात दोन समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशा तीव्र भावना  ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केल्या. असे झाल्यास याची संपूर्णतः जबाबदारी प्रशासनाची राहील. तसेच वक्फ बोर्डाने दाखल केलेला दावा बेकायदेशीर ठरवून ग्रामपंचायतीला अवगत करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर सर्व गावकरी सामूहिक आत्मदहन करतील असा इशारा मंजुर येथील ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.