५ वर्षीय मुलाची हत्या करून मृतदेह फेकला नदीत

कोपरगाव  प्रतिनिधी, दि. २१ :  अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अंदाजे ५ ते ६ वर्षीय असलेल्या मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह पांढऱ्या रंगाच्या कापडात गुंडाळून गोदावरी नदीत असलेल्या पुलाखाली फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली असून हत्या कशासाठी केली ? असून हा नरबळी तर नाही ना? अशा एक ना अनेक तर्क वितर्कामुळे या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली  आहे.

कोपरगाव तालुक्यातील शिर्डी-सुरत राज्य मार्गावरील चासनळी येथील गोदावरी नदी पात्रातील पुलाच्या खाली  दुपारच्या सुमारास नदीकाठी गेलेल्या काही स्थानिकांना संशयास्पद वस्त्र नदीमध्ये तरंगताना आढळले. असता जवळ जाऊन पाहिल्यानंतर पांढऱ्या रंगाच्या कापडात गुंडाळलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याचे समजले.

घाबरलेल्या नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली असता शिर्डी पोलिस उपविभागीय अधिकारी शिरिष वमने पोलिस निरीक्षक संदिप कोळी  पोलिस उपनिरीक्षक वैशाली मुकणे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी जाऊन पोहोचले व  मृतदेह ताब्यात घेतला. प्राथमिक तपासात मृत मुलाच्या शरीरावर जखमा सदृश्य निशाण असल्याचे आढळले आहे, सदर मृतदेह  रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आला आहे ज्यातून पुढील तथ्ये उघड होण्याची शक्यता आहे.

घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, मृताच्या कुटुंबीय व स्थानिक नागरिकांची चौकशी केली जात आहे. ही घटना समजल्यावर परिसरात संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. लोकांनी या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

या घटनेने पुन्हा एकदा मुलांच्या सुरक्षिततेबाबत समाजाला अंतर्मुख केले आहे. पालकांनी आपली मुले सुरक्षित असल्याची खात्री करावी, तसेच मुलांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे पोलीस प्रशासनाने नागरिकांना सांगितले असून या प्रकरणात कोणतीही माहिती असल्यास पुढे येण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक संदिप कोळी यांनी केले आहे. तसेच, नागरिकांनी अफवा पसरवून तपासात अडथळा निर्माण न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या निर्दयी घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

Leave a Reply