कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : प्रस्थापित नेते मंडळींच्या विरोधात लिहिण्याची हिंमत कोपरगावच्या पत्रकारांमध्ये आहे. पत्रकारांच्या रोखठोक लिखाणामुळे तालुक्याला योग्य दिशा मिळाली. सहकार, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक कामात झालेला विकास यामध्ये निश्चितच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कोपरगावच्या पत्रकारांचा देखील खारीचा वाटा आहे. कोपरगाव तालुक्याच्या जडणघडणीत पत्रकारांचे मोलाचे योगदान राहिले असल्याचे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांनी केले. ते कोपरगांव तालुक्यातील पत्रकारांचा पत्रकार दिनाच्या निमित्ताने सन्मान करताना बोलत होते.

कोपरगाव तालुका शिवसेना व पोहेगाव नागरी पतसंस्थेच्या वतीने कोपरगाव येथे शहर व तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कोपरगाव बाजार समितीचे संचालक सर्जेराव कदम, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख विमल पुंडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब रहाणे, मिनानाथ जोंधळे, श्रीमती आरती गाढे, श्रीमती मुमताज शेख, मनिल नरोडे, घनश्याम वारकर, सुनील साळुंखे, अक्षय जाधव, आदित्य गरुड, सनी गायकवाड, पवन गायकवाड, ऋषिकेश बारहाते अदी सह शिवसेनेचे पदाधिकारी व पोहेगाव नागरी पतसंस्थेचे अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक व पत्रकारांचे स्वागत बाळासाहेब रहाणे यांनी केले.

यावेळी महिला जिल्हाप्रमुख विमलताई पुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पत्रकार हा लोकशाहीचा चौथा खांब आहे, पत्रकार हे कोणत्याही अपेक्षाविना तळागाळातील घटना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ते प्रामाणिकपणे करीत असतात कुठेतरी महिला असुन मला त्यांनी वेळोवेळी प्रसिद्धी दिली. तर चांगल्या कामासाठी नितीनराव औताडे यांनी पाठबळ दिले असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना नितीनराव औताडे यांनी सांगितले की, समाजात अनेक घटक काम करत यात पत्रकारांचे काम महत्त्वाचे आहे. तीन दशकांपासून पत्रकारांचा आणि आमचा संबंध आलेला आहे. कोपरगाव तालुक्यातील पत्रकार हे आपले कर्तव्य चोखपणे बजावत असतात. सामाजिक राजकीय जीवनामध्ये अनेक चढउतार आले. आमच्या चांगल्या कामाची दखल कोपरगावच्या पत्रकारांनी घेतली त्यामुळे तीस वर्ष प्रामाणिक राजकारणात धग धरू शकलो. पत्रकारांनी दिलेल्या चांगल्या कामाच्या बातमीमुळेच नेहमी प्रोत्साहन मिळाले.

शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात केलेले उल्लेखनीय काम. यामुळे महायुतीला मोठं यश मिळालं. पक्षाने दिलेली जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी खूप मोठी असून तालुक्यामध्ये शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शेवटी औताडे यांनी सांगितले. पत्रकार राजेंद्र सालकर यांनी देखील तीन दशकात पत्रकारितेत झालेले बदल, पूर्वीची पत्रकारिता व आत्ताची पत्रकारिता याबद्दल मार्गदर्शन केले. शेवटी आभार शहर प्रमुख अक्षय जाधव यांनी मानले.
