शिक्षणासाठी आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करणार – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : विज्ञानाच्या सहाय्याने आपण जगातल्या कुठल्याही संकटावर मात करू शकतो व विज्ञान आणि गणित यांच्या मदतीने आपण यशाला गवसणी घालू शकतो. विज्ञान आणि गणित आपल्या सर्वांच्या समृद्ध आणि प्रगतीशील भविष्यासाठी आवश्यक आहेत. विज्ञान-गणित व पर्यावरण प्रदर्शनाच्या माध्यमातून नवनवीन बाल वैज्ञानिक घडले पाहिजे. त्यासाठी शिक्षण क्षेत्राला आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी दिली.

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील रयत शिक्षण संस्थेच्या जनता इंग्लिश स्कूलमध्ये पंचायत समिती कोपरगाव आणि विज्ञान, गणित अध्यापक संघ आयोजित ५२ वे कोपरगाव तालुका विज्ञान-गणित व पर्यावरण प्रदर्शन सन २०२४-२५ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जी.प.सदस्य राजेश परजणे होते. याप्रसंगी तहसीलदार महेश सावंत, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक दिलीपराव बोरणारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे, सामाजिक कार्यकर्ते संजयराव काळे, शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष मधुकर साबळे, सरपंच सुलोचना ढेपले, उपसरपंच विवेक परजणे आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार काळे पुढे म्हणाले की, प्रत्येक क्षेत्रात असलेले विज्ञान आणि गणिताचे महत्त्व नाकारता येणार नाही. विविध क्षेत्रातील नवनवीन शोधांमुळे आपले जीवन अधिक सुलभ आणि समृद्ध बनले आहे. विविध वैज्ञानिक दृष्टिकोन आणि गणिताचे ज्ञान जीवनाच्या विविध क्षेत्रात उपयोगात आणून समाजाची प्रगती साधली जात आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध प्रोजेक्ट्स व मॉडेल पाहता त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दडल्याचे स्पष्ट होत असून हे बालवैज्ञानिक आपल्या देशाचे उद्याचे भविष्य आहे.

या बाल वैज्ञानिकांच्या कल्पकतेला व वैज्ञानिक दृष्टीकोण वृद्धिंगत होण्यासाठी गणित विज्ञान प्रदर्शनातून उपलब्ध करून दिलेली संधी कौतुकास्पद असून या माध्यमातून भविष्यात मोठे वैज्ञानिक घडू शकतील असा विश्वास आ. आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी चंदूमामा लोखंडे, बाळासाहेब आबक, लक्ष्मणराव साबळे, चंद्रशेखर देशमुख, औद्योगिक वसाहत संचालक पंडितराव भारूड, ग्रामपंचायत सदस्य तुषार बारहाते, अशोक लोहकणे, गटविकास अधिकारी संदीप दळवी, कृषी अधिकारी सचिन कोष्टी, पंडितराव वाघीरे, गट शिक्षणाधिकारी शबाना शेख, सर्व विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक सर्व शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply