शिर्डी प्रतिनिधी, दि. १२ : संघटन पर्वाच्या माध्यमातून पक्षाची बांधणी मजबुत करतानाच येणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत पक्षाला पुन्हा विजय प्राप्त करुन देण्याचा संकल्प या आधिवेशनात आम्ही करणार आहोत. मात्र महायुती म्हणूनच निवडणूकीला सामोरे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. विधानसभा निवडणूकीत कार्यकर्त्यांनी नेत्यांना साथ दिली, आता नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या पाठीशी ताकद उभी करायची आहे असे स्पष्ट प्रतिपादन महसूल मंत्री तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या शिर्डी येथील प्रदेश आधिवेशनाच्या पुर्व संध्येला मंत्री बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधून आधिवेशना मागची भूमिका स्पष्ट केली. यामध्ये प्रामुख्याने त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचा उल्लेख करुन, या निवडणूकींना आम्ही महायुती म्हणूनच सामोरे जाणार असल्याचे सांगून या निवडका कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यामुळेच पक्षाची संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी आम्ही उभी करणार आहोत.
शिर्डी येथे होत असलेले आधिवेशन हे एैतिहासिक आहे. राज्यात विधानसभा निवडणूकीत जनतेने फडणवीस सरकार निवडून दिले. २३७ संख्याबळ असलेले हे सरकार निवडणून दिल्या बद्दल जनतेचे आम्ही आभार मानणार आहोत. कार्यकर्त्यांनीही या विजयात मोठे योगदान दिले, त्यांचेही आभार व्यक्त केले पाहीजे. अशा कार्यकर्त्यांचा सन्मानही केला पाहीजे यासाठी हे आधिवेशन महत्वपूर्ण आहे. आधिवेशनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेही मार्गदर्शन होणार असून, मंत्री आशिष शेलार हे अभिनंदनाचा ठराव मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अगामी काळात महायुतीने दिलेल्या आश्वासनांची पुर्ती करणे हे आमचे उदिष्ठ असून, सोबतीलाच पक्षाचे संघटन पर्व सुरु झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीला सामोरे जाण्यासाठी संघटन मजबुत करुन दिड कोटी सदस्य संख्या आम्ही गाठणार आहोत. आमची निवडणूकीची तयारी असली तरी, महायुती म्हणून, निवडणूकीला आम्ही सामोरे जाणार आहोत असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांचा पैसा लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी संघटन आणि समाज मजबुत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हिंदुत्वाचा विचार हा जीवन मजबुत करण्यासाठी असतो. भाजपाने जात, धर्म कधी पाळले नाही, सर्व समाज घटकांना बरोबर घेवूनच भारतीय जनता पक्ष पुढे जात असल्याचे बानकुळे यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाने श्रध्दा आणि सबुरीचा संदेश स्विकारुनच आपली वाटचाल केली आहे. सत्तेचा उन्माद आम्ही कधी केला नाही, मात्र यापुर्वी जनाधार डावलून उध्दव ठाकरे यांनी महाविकास आघाडीला साथ दिली. त्यांच्या विजयाच्या रॅलीत पाकीस्तानचे झेंडे दिसले. आता काही गोष्टी त्यांच्या उशिरा लक्षात आल्या आहेत. अशी परिस्थिती असली तरी, महाराष्ट्राचे राजकारण हे संस्कृती आणि संस्कार पाळून पुढे जाते, मनात कटूता ठेवून चालत नाही.
त्यामुळेच उध्दव ठाकरे यांनी देवेंद्रजींवर टिका केली असली तरी, नियतीने त्यांना दोन महिन्यातच भेटीसाठी पाठविले, याकडे लक्ष वेधून मुख्यमंत्री फडणवीस विरोधी पक्षातील नेतेही त्यांच्या भेटी घेत आहेत. यातूनच राज्याच्या विकासाच्या दृष्टीने काही सुचना स्विकारत आहेत याकडेही मंत्री बावनकुळे यांनी लक्ष वेधले. याप्रसंगी प्रदेश कार्याध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण, महामंत्री विजय चौधरी, पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये, डॉ.सुजय विखे पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दिलीप भालसिंग उपस्थित होते.