कोपरगाव प्रतिनिधी, दि. १३ : कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी चमकदार कारवाई करीत समृद्धी महामार्गावरून ६५ हजार रुपये किमतीचे १८६ लोखंडी अंॅगल चोरणाऱ्या आरोपींना तालुका पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्याकडील पिकअप वाहनासह ४ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सागर हनुमंत आहेर, अशोक बळीराम आहेर व लोखंड विकत घेणारा विजय संजय मुळेकर या तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. तिन्ही आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळी यांनी दिली.

आठ जानेवारी रोजी समृद्धी महामार्गाचे सुपरवायझर मोहन निगडे यांनी चोरीची फिर्याद दाखल केली होती. पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी तपासाची चक्रे फिरवत गुप्त बातमीदाराच्या सहय्याने गती दिली. पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल रशीद शेख, प्रकाश नवाळी,किसान सानप, मधुसूदन दहिफळे यांचे पथक तयार करून सापळा रचला. त्यात आरोपी सागर हनुमंत आहेर(२४), अशोक बळीराम आहेर (२९ ) रा. आहेर वस्ती, भोजडे यांना अटक केली.

गुन्ह्यातील आरोपींनी सदर माल कोणाला विकला याबाबत अधिक चौकशी केली असता त्यातील आरोपी विजय संजय मुळेकर रा. शिवाजीनगर, दहेगाव बोलके याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. गुन्ह्यातील १८६ लोखंडी अंॅगल, चार लाख रुपयांची पिकअप वाहन क्र एम एच ०४ जी आर ६८५० ही जप्त करण्यात आली या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी करत आहेत.
