कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी फाट्यावर झाला भिषण अपघात
कोपरगाव प्रतिनिधी, दि. १४ : कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी फाटा येथील शिर्डी – लासलगाव महामार्गावर सोमवारी मध्यराञी चारचाकी इको गाडी पलटी होवून झालेल्या भिषण अपघातात राहता तालुक्यातील कोल्हार जवळील तिसगाव वाडी येथील अमोल मधुकर कडू व संदीप बाळासाहेब सदाफळ या दोघा युवकांचा मृत्यू झाला तर त्यांच्या सोबतचे पाचजन जखमी झाले.
या घटनेची मिळालेली अधिक माहिती अशी की, राहता तालुक्यातील कोल्हार जवळील तिसगाव वाडी येथील सात तरुण मुलं संक्रांतीच्या सणा निमित्ताने वणी येथील सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी सोमवारी राञी इको गाडीतून शिर्डी लासलगाव महामार्गाने जात असताना राञी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास गाडी चालक अमोल मधुकर कडू याचं गाडीवरील नियंत्रण अचानक सुटले. सरळ असणाऱ्या रस्त्याच्या मध्येच लवण असल्याने तिथे गतीरोधक नसल्याने गाडीची गती नियंत्रणाबाहेर गेली आणि काही क्षणात गाडी रस्त्याच्या बाजुला जावून झाडाला आदळून कोलांट्या घेत पलटी झाली.
या अपघातात चालक अमोल मधुकर कडू व संदीप बाळासाहेब सदाफळ या दोघांना गंभीर इजा होवून त्यांचा उपचारा पुर्वीच मृत्यू झाला. गाडीतील लक्ष्मण सदाफळ, योगेश कणसे, सतिश सदाफळ, गोरख निबे, जखमी झाले आहेत. त्यापैकी योगेश कणसे याला कोपरगाव येथील एस.जे.एस. रुग्णालयात उपचार सुरु असुन इतरांना प्राथमिक उपचार करुन घरी सोडण्यात आले.
मयत अमोल कडू अविवाहीत होता तर संदीप बाळासाहेब सदाफळ याला दोन छोटे मुलं आहेत. शोकाकुल वातावरणात या दोघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. ऐन संक्रांतीच्या दिवशी गावावर शोककळा पसरली आहे. आपल्या आयुष्यात संक्रांतीचा सण देवीच्या दर्शनाने करण्यासाठी मिञ एकञ जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. दरम्यान कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
या भिषण अपघातात गाडीने तिन वेळा पलट्या घेतल्याने गाडीतील सात जणांचा जीव धोक्यात गेला होता माञ. स्थानिक नागरीकांच्या मदतीने तातडीने बचावकार्य केल्याने अनेकांना जीवदान मिळाले.