कोपरगांव प्रतिनिधी, दि. १८ : ब्रम्हलिन संत रामदासी महाराज निष्काम कर्मयोगी होते, सध्या प्रयागराज येथे जगातील महाकुंभ पर्व सुरु आहे. रामदासी बाबांनी कोपरगांवकरांना गोदाकाठी कुंभमेळ्याची अनुभूती दिली असे प्रतिपादन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती प.पू. रमेशगिरी महाराज यांनी केले.
तालुक्यातील श्रीक्षेत्र कोकमठाण येथील ब्रम्हतिन संत रामदासीबाबा यांच्या ३५ व्या पुण्यतिथीनिमीत्त तुकाराम गाथा पारायण सोहळ्याचे १६ ते २३ जानेवारी पर्यंत आयोजन केले त्याचे ग्रंथपुजन करतांना ते बोलत होते. प्रारंभी प. पू. रमेशगिरी महाराजांनी ब्रह्मलीन संत रामदासी महाराज समाधीमंदिराचे दर्शन घेतले. ह.भ.प. रामदास महाराज वाघ, तुकाराम महाराज वेलजाळे यांनी प्रास्तविक केले.
प.पू. रमेशगिरी महाराज पुढे म्हणाले की, कोपरगांवची भुमी ऐतिहासिक व धार्मीक परंपरने नटलेली आहे. साईबाबा, चक्रधर स्वामी, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी, जंगलीदास माऊली, शिवानंदगिरी, शृंगेश्वर, उपासनी महाराज, रामदासी महाराज, नारायणगिरी महाराज, राघवेश्वरानंद, आदि संत महतांनी येथील भाविकांना अध्यात्माबरोबरच संस्कारचे शिक्षण दिले. रामदासी बाबांनी लहान मुलांना गीता, राम रक्षा, मारुती स्तोत्र आधी अध्यात्माची संथा दिली. ब्रम्हालीन संत रामदासीबाबा यांनी दक्षिणवाहिनी गोदाकाठी तपश्चर्या करून कोकमठाण तीनखणी सचेतन केली.
प्रयागराज येथे गंगा यमुना आणि सरस्वती संगम काठी जगातील मोठ्या धार्मिक कुंभमेळ्याचे पहिले शाहीस्नान मकरसंक्रांतीच्या पर्वावर पार पडले. १३ आखाड्यातील संत महांतांनी त्यात डुबकी मारली. हरहर महादेव आणि सीताराम राधेश्यामचा स्वर आसमंतात गुंजला; कोपरगावकरांना कुंभमेळा काय असतो त्याची शिकवण ब्रह्मलीन संत रामदासी महाराज यांनी दिली.
त्यांनी स्वतः गोदाकाठी याची देही याची डोळा असंख्य भक्तांना अनुभूती दिली, त्यांची आठवण कोकमठाण पंचक्रोशीय गेल्या ३५ वर्षापासून जपत आहे हे विशेष. यावेळी वीणा, टाळ, मृदूंग, ग्रंथ, कलश, गंगापूजन रमेशगिरी महाराजांच्या हस्ते पार पडले. पौरोहित्य सोमनाथ जोशी गुरुजी यांनी केले, शेवटी शरद थोरात यांनी आभार मानले. यानिमीत्त किर्तन सप्ताहाचे आयोजन केले आहे.