संजीवनी युवा प्रतिष्ठानची किल्ले शिवनेरी मोहिम उत्साहात संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १० : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळी किल्ले शिवनेरी येथे संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या समवेत शेकडो युवा सेवकांनी स्वच्छता मोहिम राबवत ऐतिहासिक ठेवा जाणून घेतला आहे. युवकांच्या वैचारिक जडणघडणीसाठी सतत संस्कृतीला जतन करणारे उपक्रम घेण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानचा सुरू असतो. या उपक्रमात सव्वादोनशे हून अधिक युवकांची प्रवास, निवास, भोजन व्यवस्थासह वैद्यकीय खबरदारी घेत अतिशय आनंदात हा उपक्रम पार पडला.

युवकांच्या जीवनाला दिशादर्शी असणाऱ्या महापुरुषांच्या ऐतिहासिक प्रेरणादायी ठिकाणांची माहिती असणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी कार्य जीवनात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी मोलाचे आहे. प्रतिष्ठानचे संस्थापक युवानेते विवेक कोल्हे यांनी ही संकल्पना राबवली असून युवा शक्तीला ऊर्जा मिळण्यासाठी महत्त्वाची ठरली आहे.

दि. ८ मार्च आणि ९ मार्च अशी दोन दिवसीय असणारा हा दौरा एकप्रकारे अभ्यासदौरा देखील ठरला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी ज्या गडकोटांचे महत्व आपल्या कार्यकर्तृत्वाने जोपासले ती ऊर्जा युवकांना इथून मिळेल हा विश्वास विवेक कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.

सर्वांनी शिवाई देवीच्या मंदिरात दर्शन घेत गडावरील सर्व द्वारांची आणि इतिहासाची माहिती घेतली. या प्रसंगी गड पाहणी करत असताना माहिती देणारे टुरिस्ट गाईड सोबत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संघटन आणि नियोजन यावर प्रकाश टाकणारे मनोगत शाहीर मुकुंद भोर यांनी व्यक्त केले.

गडावर जाताना वाटेत पडलेला कचरा पाण्याच्या बॉटल युवकांनी संग्रहित करून स्वच्छतेचे महत्व विशद करणारे फलक ठीक ठिकाणी दाखवत पर्यटकांना देखील यासाठी प्रोत्साहित केले. गडकिल्ले स्वच्छता राखण्यासाठी आणि महिला सुरक्षा सन्मानाचे संदेश देणारे फलक युवकांच्या हातात होते.

Leave a Reply