शेवगाव येथे जिजाऊ ब्रिगेडतर्फे महिला दिन साजरा

शेवगाव प्रतिनिधी, दि. १० : तालुक्यातील मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड आणि मराठा पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तालुक्यातील विविध स्तरांवर कार्यरत असलेल्या महिलांसह मराठा पतसंस्थेचे व्यवस्थापक आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

जिजाऊ ब्रिगेड, मराठा सेवा संघ आणि मराठा पतसंस्था महिला सबलीकरणासाठी सातत्याने कार्यरत असून, भविष्यातही हे कार्य अधिक व्यापक करण्याचा निर्धार या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला.     

जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष शिवमती डॉ. शितल देवढे आणि जिल्हा सचिव शिवमती रोहिणी नलवडे  यांच्या अध्यक्षतेखाली रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पहिल्या सत्रात अॅड. श्रद्धा खेडकर यांनी महिला विषयक कायदे आणि महिला संरक्षण याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर क्रिस्टल मेकअप पार्लरच्या कृष्णाली पायघन यांनी घरच्या घरी झटपट मेकअप करण्याच्या तंत्राबाबत माहिती दिली.

यानंतर मराठा पतसंस्था – एक अर्थस्तंभ या विषयावर पतसंस्थेचे व्यवस्थापक महेश नलवडे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी समाजातील तरुण आणि होतकरू महिलांना उद्योजकतेसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याच्या संकल्पनेवर भर दिला.

 डॉ. देवढे यांनी जिजाऊ ब्रिगेडच्या शेवगाव तालुक्यातील नवीन कार्यकारिणी जाहीर केली, ज्यामुळे तालुक्यातील महिला सशक्तीकरणाच्या चळवळीला अधिक बळ मिळणार आहे महिलांनी स्वतःच्या हक्कांबाबत जागरूक राहावे, स्वतःचा आर्थिक विकास साधावा आणि समाजात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करावे, असा महत्वपूर्ण संदेश त्यांनी दिला. शिवमती समिता देवढे यांनी प्रास्ताविक केलं शिवकुमारी प्राची भोसले यांनी सुत्र संचलन केले, छकुली काळे यांनी आभार व्यक्त केले. 

Leave a Reply