जीवन जगण्याचं शास्त्र आणि सुत्र याची शिकवण रामायणांतुन मिळते- साध्वी सोनालीदिदी कर्पे

माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या तिस-या पुण्यस्मरणानिमीत्त रामकथेस सुरुवात

कोपरगांव प्रतिनिधी, दि.१७ : प्रसन्नमय भक्तीभावाचे वातावरण, कार्यक्रमाचे भव्यदिव्य व्यासपिठ, सजविलेल्या बग्गीतुन साध्वीची मिरवणुक साथीला डोक्यावर मंगल कलश घेवुन चालणाऱ्या कुमारीका-महिला, फुलांची मुक्त उधळण व फटाक्यांची आतषबाजी, सनई चौघडा-संबळ-बँड पारंपारीक वाद्याच्या तालावर नाचण्याचा मनमुराद आनंद घेणारे भाविक, रामकथेस लयबध्द संगित आणि पात्रांची झांकी बहारदरपणे सादर करणारा साध्वींचा समुहसंच, चकलंबा कल्याणस्वामी महिला वारकरी शिक्षण संस्थेच्या पंचवीस विद्यार्थीनींचा लयबध्द टाळ मूंदुगाचा निनाद दिमतीला संजीवनीची यंत्रणा अशा सगळ्या भक्तीमय वातावरणांत चकलंबाच्या साध्वी सोनालीदिदी कर्पे यांनी पहाडी आवाजातुन कोपरगांवकरांची मने पहिल्याच दिवशी जिंकली, राम आणि रावण या व्यक्ती आणि प्रवृत्ती कशा होत्या, जीवन जगण्याचं शास्त्र आणि सुत्र याची शिकवण रामायणांतुन मिळते असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमस्थळी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या चित्ररूपी विकासाची छायाचित्रे, रामायणातील चित्रीत केलेले मुख्य प्रसंग, अयोध्येतील हुबेहुब श्रीरामाची प्रतिकृती अनेकांचे लक्ष वेधुन घेत होती.

             सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या तिस-या पुण्यतिथीनिमीत्त तहसिल कार्यालय मैदान कोपरगांव येथे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्ट व संजीवनी उद्योग समुह, संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने प्रभु श्रीरामकथा सोहळयाचे १६ ते २३ मार्च दरम्यान आयोजन करण्यांत आले त्याचे पहिले पु पुष्प गुंफतांना साध्वी सोनालीदिदी कर्पे बोलत होत्या.

प्रारंभी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत केले, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे,सौ.कलावतीताई कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीटयुटचे मॅनेजिंग ट्रस्टी अमितदादा कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, कोपरगांव तालुका स्वयंसहायता महिला बचतगटाच्या अध्यक्षा रेणुकाताई कोल्हे, श्रद्धाताई कोल्हे आदींची उपस्थिती होती. यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते रामायण ग्रंथ व साध्वी सोनालीदिदी कर्पे यांचे विधीवत पुजन करण्यांत आले. स्व. शंकरराव कोल्हे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ नेते दत्तूनाना कोल्हे, सुरेश कोल्हे, व्हा.चेअरमन राजेंद्र कोळपे यांनी केले.

संत तुकाराम महाराज बीज निमित्ताने जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून ह.भ.प.स्व.गणपत महाराज लोहाटे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सभापती व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टचे उपाध्यक्ष मच्छिंद्र टेके यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करून माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांचा दरारा व त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. 

साध्वी सोनालीदिदी कर्पे पुढे म्हणाल्या की, जीवनाची सुरूवात आणि शेवटही राम नामानेच आहे, मधल्या प्रवासात राम आठवला तर आराम आहे नाही आठवला तर हराम आहे. आज प्रत्येकाची मनं साभोवतालच्या वातावरणांमुळे गढूळ झाली आहे, माणूस मन आणि माणूसपण हरवत चालला आहे,  त्रेतायूगापासून सुरू असलेले रामायण अद्यापही जुने झालेले नाही. व्यवहार, कृती, जीवन कसं जगावं याची शिकवण रामायणातुन मिळते, कलीयुगात आज घराघरात महाभारत सुरू आहे, सासू-सुन, नणंद-भावजय, भाउ-भाउ आदि नाती शत्रुसारखे जगत आहेत हा शत्रुपणा दुर करण्याची शिकवण श्रीरामकथा देते, ती गंगेसारखी पवित्र आहे त्यात कितीही डुबक्या मारल्या तरी प्रत्येक वेळेस नव-नविन विचाराचं प्रसारण त्यातून होतं.

राम एक वचनी-एकबाणी – एक पत्नी मर्यादापुरुषोत्तम होते तर रावण बुध्दीवंत, किर्तीवंत, महादेवभक्त, शौर्यवान, धैर्यवान होता पण तो अधर्माने वागला, त्याची नजर व्यवहार वृत्ती चांगली नव्हती म्हणून रामाला त्याचा वध करावा लागला. रावणाची पत्नी मंदोदरी अत्यंत पतिव्रता होती पण तिच्या नशीबी पतीचं दुःख होतं. दशमुख (रावण) आणि दहा इंद्रियांच्या रथावर स्वार होवुन धर्माचे आचरण करणारा दशरथ या दोन व्यक्तीरेखांची ओळख रामायणांत होते. देशाची ओळख राम आहे पण आपण ती विसरत चाललो आहे. जन्माला कुठं यायचं हे आपल्या हातात नाही पण जन्माला आल्यानंतर ठसा उमटवणं आपल्या हातात आहे त्यात माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे नांव अग्रभागी आहे.

ते कर्तृत्ववान, संघर्षशील, जनसेवेचे वारकरी, राज्याच्या राजकारणांतील विकासपुरूष, धैर्यशील, शेती आणि पाणी या घटकासाठी त्यांनी उभं आयुष्य खर्ची घालत शेतक-यांची आर्थीक क्रयशक्ती वाढविण्यांत ते वाकबगार होते, जे प्राप्त केलं ते सहज मिळवलं नाही तर संघर्षातुन संजीवनी नावाचं साम्राज्य उभं करत अनेकांचे संसारप्रपंच फुलविले, मुंबई-पुणे-चेन्नई येथे मिळणारे अभियांत्रीकी तांत्रीक व्यावसायिक दर्जेदार शिक्षणाच्या सोयी ग्रामिण भागातील शेतकरी घटकातील विद्यार्थ्यांसाठी ४३ वर्षापुर्वीच कोपरगांवी निर्माण केल्या यातुन त्यांचा भविष्याचा दुरदृष्टीकोन किती विशाल होता याची जाणिव होते असे त्या शेवटी म्हणाल्या. द्वितीय पुष्प १७ मार्च रोजी गुंफले जाणार असून प्रभू श्रीराम जन्मसोहळा साजरा होणार आहे.