संत समाजाचं भलं करतात – साध्वी सोनालीदिदी कर्पे

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २२ :   जीवन जगण्याची कला रामायणातुन मिळते, परमेश्वर आणि भक्त यांच्यातील संदेशचे वहन संत करतात, ते समाजाचं भलं करतात, संत ज्या ज्या ठिकाणी जातात तेथे अध्यात्म संस्काराचा पाया अधिक मजबुत होतो असे प्रतिपादन साध्वी सोनालीदिदी कर्पे यांनी केले.

         शहरातील संत ज्ञानेश्वरनगरी तहसिल कार्यालय मैदानावर माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या तिस-या पुण्यतिथीनिमीत्त कल्याणस्वामी संस्थान चकलंबा (गेवराई-बीड) अन्नपुर्णा माता मुलींची वारकरी शिक्षण संस्थेच्या संस्थापिका, साध्वी सोनालीदिदी कर्पे यांच्या रसाळवाणीतुन संगीतमय प्रभु श्रीरामकथेचे आयोजन करण्यांत आले असुन त्याचे सहावे पुष्प गुंफतांना त्या बोलत होत्या. सौ. प्रिया व पियुष कोल्हे यांच्या हस्ते आरती, रामायणग्रंथाचे पुजन झाले.

          प्रारंभी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज, विश्वात्मक जंगलीदास माउली आश्रमाचे परमानंदगिरी महाराज, चांगदेव महाराज, अशोकानंद महाराज, सार्थकानंद महाराज, अनंतराज महानुभाव (सुरेगाव) आदि संत महंतांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या हस्ते पुजन करण्यांत आले.

            राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती प. पू. रमेशगिरी महाराज याप्रसंगी बोलतांना म्हणांले की, गेल्या तीन वर्षांपासुन या पंचक्रोशीतील भाविकांना सहकार महर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्ट अध्यात्म ज्ञानाची शिदोरी देत आहे. कथा हया जीवनाच्या व्यथा दूर करतात यातुन अध्यात्म प्रबोधन होते. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे समाजकार्य अनेकांना प्रेरणा देणारे आहे.

         विश्वात्मक जंगलीदास माऊली आश्रमाचे प. पू. परमानंदगिरी महाराज म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी अनेकांना जीवन जगण्याचा मार्ग दाखविला. या भागात सहकाराच्या माध्यमांतुन शाश्वत विकासाला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले.

         साध्वी सोनालीदिदी कर्पे पुढे म्हणाल्या की, पैठणच्या संत एकनाथांचे गुरू जनार्दन स्वामी होते, आणि कथास्थानावर राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज आले हा अलौकीक योग आहे. मनुष्याने नेहमी सत्कर्म करावे. संत संगतीचा प्रभाव मतीमंदालाही हुशार बनवतो. रावणांने फसवुन वेशांतर करून साधुच्या रूपात सीतेचे हरण केले, शबरी भेट आदि प्रसंगावर साध्वी सोनालीदिदी कर्पे यांनी सखोल विवेचन केले. शिव तांडव नृत्याच्या झाकीने भाविकांना मंत्रमुग्ध केले. भगव्या वस्त्र परिधानाने भाविकांची उपस्थिती विशेष खुलून दिसत होती.

Leave a Reply