शेवगावमध्ये शौचालयासाठी एक कोटीचा खर्च, दर्जा निकृष्ट

शेवगाव प्रतिनिधी, दि. ५ : शेवगाव शहरातील शौचालय दुरुस्ती व नवीन निर्मिती ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. या संदर्भात अनेक वेळा माहिती मागून सुद्धा हेतू पुर:सर नगर परिषदेने याची माहिती दिलेली नाही. शेवगाव शहरातील  नवीन बांधकाम व दुरुस्ती पैकी वाल्मीकनगर येथील शौचालय वगळता एकही शौचालय उपयोगात  नाही. या शौचालयाजवळ अत्यंत घाणीचे साम्राज्य आहे. स्थापनेपासून ते आज तागायत जवळपास  एक कोटीचा खर्च या कामावरती झाला असून  ठेकेदारानी बोगस काम करून त्या शौचालयांची दुरावस्था करून टाकली आहे.

त्यामुळे त्या शौचालय दुरुस्ती व निर्मिती या कामांमधील सर्व ठेकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये  टाकावे व जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत यावर नव्याने कुठलाही खर्च करू नये या ठेकेदारांना कुठलेही नवीन काम देण्यात येऊ नये. अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. निरज लांडे पाटील यांनी केली आहे.

तसेच शेवगाव शहर  हे तालुक्याचे ठिकाण असल्याने ११२ गावातील नागरिकांचा रोजच विविध कामाच्या निमित्ताने  या शहरात राबता आहे. तरीही  शहरात  माता-भगिनींसाठी एकही सुलभ शौचालय नाही . त्यामुळे शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत माता-भगिनींसाठी सुलभ शौचालयाची निर्मिती हायला हवी. अशी मागणी डॉ. लांडे पाटील यांनी नगरपरिषदेस दिलेल्या लेखी निवेदनात  केली आहे. 

Leave a Reply