कोपराव प्रतिनिधी, दि. २३ : भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय, दिल्ली यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पी. एम. यशस्वी (PM-YASASVI) राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेत आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरुकुल व ज्युनिअर कॉलेज, कोकमठाण या संस्थेने अभूतपूर्व यश मिळवले आहे.

या योजनेअंतर्गत इतर मागासवर्ग (OBC), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EBC) आणि विमुक्त, भटक्या जमाती (DNT) या गटातील गुणवंत विद्यार्थ्यांना नववी ते बारावी इयत्तेत शैक्षणिक स्कॉलरशिप दिली जाते. या अनुषंगाने, आत्मा मालिक गुरुकुलने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये १४ विद्यार्थ्यांना एकूण ₹ ४,४८,००० शिष्यवृत्ती मिळवून दिली.

तर २०२३-२४ मध्ये ४३ विद्यार्थ्यांची निवड होऊन तब्बल ₹ १३,७६,००० इतकी रक्कम शिष्यवृत्तीच्या स्वरूपात विद्यार्थ्यांना प्राप्त झाली आहे. एकंदरित आतापर्यंत संस्थेच्या विद्यार्थ्यांनी ₹ १८,२४,००० ची शिष्यवृत्ती मिळवली आहे.

ही कामगिरी महाराष्ट्रातील सर्व इंग्रजी माध्यमातील खाजगी शाळांमध्ये उल्लेखनीय मानली जात आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित असलेले हे गुरुकुल, महाराष्ट्र शासनाच्या मोजक्या नामांकित शाळांपैकी एक आहे. याशिवाय, गेल्या दोन शैक्षणिक वर्षांमध्ये ५७ विद्यार्थ्यांनी एकूण ₹ १ कोटीपेक्षा जास्त शिष्यवृत्ती मिळवून राज्यस्तरावर एक विक्रम प्रस्थापित केला आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व शिष्यवृत्ती धारकांचे व त्यांच्या मागे उभ्या असलेल्या संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, शैक्षणिक व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे, प्राचार्य माणिक जाधव, उपप्राचार्य नितिन सोनवणे, प्राथमिक विभागाच्या प्राचार्या मिनाक्षी काकडे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक मंडळींनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. या यशाचे श्रेय प.पू. सद्गुरू आत्मा मालिक माऊली व सर्व संत मंडळींच्या आशीर्वादाला दिले जात आहे. गुरुकुलच्या या पुढाकारामुळे भविष्यातही आणखी विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
