मा.आ.अशोकराव काळेंनी दिल्या वारकऱ्यांना शुभेच्छा
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० : माजी खासदार स्व.कर्मवीर शंकररावजी काळे व स्व.सौ.सुशीलामाई काळे यांच्या कृपा आशीर्वादाने माजी आमदार अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांच्या प्रेरणेतून मागील वर्षापासून श्री क्षेत्र माहेगाव देशमुख ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मागीलवर्षी प्रमाणे याहीवर्षी मोठ्या उत्साहात या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. यावेळी मा.आ.अशोकराव काळे यांनी विधिवत श्री गुरुदत्त महाराजांचे परमभक्त असलेल्या गवळीराम बाबांच्या पालखीचे पूजन करून पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

मागील वर्षापासून कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथून अमृतेश्वर भजनी मंडळ व ग्रामस्थांच्या सहकार्यातून श्री क्षेत्र माहेगाव देशमुख ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा सुरु करण्यात आला आहे. शुक्रवार (दि.२०) रोजी श्री क्षेत्र माहेगाव देशमुख येथून दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. दिंडीच्या प्रस्थानावेळी मोठ्या संख्येने वारकरी सहभागी झाले होते. भगव्या झेंड्यांच्या लहरती रांगा, टाळ-मृदंगाचा निनाद, ‘ज्ञानोबा-तुकाराम’ च्या गजरात सर्व परिसर भारावून गेला होता.

यावेळी मा.आ.अशोकराव काळे यांनी वारकऱ्यांना शुभेच्छा देतांना सांगितले की, वारी ही आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीची शान असून वारकरी संप्रदाय ही आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे. संतांच्या विचारांनी आणि नामस्मरणाच्या शक्तीने समाजाला एकतेत गुंफण्याचे कार्य वारकरी करतात आणि संतांच्या शिकवणीमुळे समाजात एकता आणि प्रेम वृंद्धीगत होते. चांगला पाऊस पडून बळीराजाचे जीवन सुखी होवून सर्वांना सुख-समृद्धी लाभावी अशी मा.आ. अशोकराव काळे यांनी श्री पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना केली.

यावर्षी नेहमीपेक्षा लवकरच पावसाला सुरुवात झाली आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु असून पांडुरंग परमात्मा सर्व वारकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तरी देखील सर्वांनी योग्य प्रकारे आपली काळजी घ्यावी व पांडुरंगाचे मनभरून दर्शन घेवून सुखरूप परत यावे असा त्यांनी भावनिक सल्ला दिला. यावेळी माहेगाव देशमुख ग्रामस्थ व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
