कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : पुढील वर्षीच्या कुंभ मेळाव्याला येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन त्यांना रस्त्यांचा कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये यासाठी केंद्र सरकारने आखलेल्या विकास आराखड्यात कोपरगाव मतदारसंघातील महत्वाच्या रस्त्यांचा समावेश करण्याची आ.आशुतोष काळेंची मागणी मान्य करण्यात आली असून त्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांचे आभार मानले आहे.

कोपरगाव मतदार संघातील महत्वाच्या असणाऱ्या बहुतांश रस्त्याला आ.आशुतोष काळे यांनी मागील पंचवार्षिक मध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणल्यामुळे त्या रस्त्यांचा प्रश्न कायमचा निकाली निघणार असला तरी उर्वरित रस्त्यांसाठी मिळेल त्या योजनेतून रस्त्यांसाठी निधी मिळविण्याचा आ. आशुतोष काळे यांचा सातत्याने प्रयत्न सुरु असतो.पुढील वर्षी नसिक येथे होणाऱ्या कुंभ मेळाव्याला पराराज्यासह देश विदेशातून भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे.

त्या पार्श्वभूमीवर नाशिकला जोडणाऱ्या सर्वच महत्वाच्या रस्त्यांचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून या विकास आराखड्यात कोपरगावच्या रस्त्यांचा देखील समावेश करावा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांचेकडे केली होती.

ती मागणी मान्य करण्यात आली असून यामध्ये सावळी विहीर-मनमाड-मालेगाव, घोटी-सिनर-वावी-शिर्डी या महत्वाच्या रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे दळणवळणांच्या दृष्टीने कोपरगाव मतदार संघाला मोठा फायदा होणार आहे. त्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघातील जनतेच्या वतीने केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांचेसह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे आभार मानले आहे.

कुंभ मेळ्याच्या विकास आराखड्यात कोपरगाव मतदारसंघातील प्रमुख रस्त्यांचा समावेश करण्यात आल्या मुळे केवळ सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नव्हे, तर भविष्यातील वाहतूक सुलभता, पर्यटकांची वाढ, तसेच स्थानिक विकासाला मोठा हातभार लागणार आहे. या निर्णयामुळे कुंभमेळ्याच्या काळात नाशिककडे जाणाऱ्या भाविकांना व पर्यटकांना कोपरगावमार्गे सुकर व सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळणार आहे.

आ. आशुतोष काळे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहे. कोपरगावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून पुढील काळात देखील अशाच पद्धतीने मोठ्या प्रकल्पांची मंजुरी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.
