कोपरगावमध्ये चमत्कार झाला नविन साहेब आले, अवैध धंदे बंद  झाले? 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : जो पर्यंत अवैध धंदे सुरू तोपर्यंत अनेकांची चलती होती होती. राजकीय कार्यकर्त्यांना राजाश्रय मिळत असल्याने विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी अवैध धंदे उभे करुन त्याच पैशाच्या जोरावर राजकीय वजन वाढवण्याचे काम काहींनी सुरु केल्याने कोपरगावमध्ये अवैध धंदे करणाऱ्यांचा सुळसुळाट सुरु असताना सध्या कोपरगाव मध्ये नवा चमत्कार घडला. नविन साहेब आले आणि अवैध धंदे गायब झाले.

त्याच घडलं असं नुकतीच पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांची नाशिक ग्रामीण येथे बदली झाली त्यांच्या जागी शहर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक रामचंद्र कुंभार यांची नियुक्ती झाली. नव्याने आलेले पोलीस निरीक्षक रामचंद्र कुंभार यांनी अवैध धंदे करणाऱ्यावर करडी नजर ठेवत अवैध धंदे करणाऱ्यांची गय करणार नसल्याचा तोंडी संदेश आपल्याच कर्मचाऱ्यांना दिला.

तोच संदेश सर्वांपर्यंत काही क्षणात पोहचला. खुद पोलीस निरीक्षक रामचंद्र कुंभार यांनी कुठेही धाड न टाकता शहरातील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद झाले. अनेकांनी आपल्या दुकानांना कुलुप लावले तरी काहींनी पोलीस स्टेशनमध्ये चकरा मारुन कानोसा घेत ‘वेट अँड वाॅच’ ची भूमिका बजावत नवीन आलेले साहेब कडक आहेत जेव्हा साहेबांचा होकार येईल तेव्हाच सुरू करू तोपर्यंत आपले धंदे बंद ठेवू अशी चर्चा शहरात जोरदार सुरु आहे.

पोलीस निरीक्षक कुंभार यांनी सध्या बेशिस्त वाहन चालवणाऱ्यांच्या पाठिमागे लागले असुन दररोज  स्वत: उभे राहून अनेक वाहने पकडून त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाहीची मोहीम सुरु केल्याने शहरात कुंभार यांचा दरारा दिसुन येत आहे. त्यातच कोपरगावच्या  इतिहासात प्रथमच एकाच वेळी सर्व विक्रेत्यांनी अवैध गुटखा विक्री  बंद केली. मटका खेळणारे आणि मटक्याचे आकडे घेणारे एकमेकाकडे बघत बसले आहेत. चक्री, बिंगोसह विविध अवैध व्यवसाय करणारे आपले सर्व धंदे बंद करुन चौका चौकात बसुन आहेत.

 दरम्यान पोलीसांनी ठरवलं तर काहीही होवू शकत हे सध्याच्या एकुण परिस्थितीवरून सिध्द होते. पोलीसांनी थोडी कडक भूमिका बजावली तर शहरातील सर्व अवैध धंदे बंद झाले हिच भूमिका पोलीस प्रशासनाने कायम बजावली तर अवैध धंदे चालवणाऱ्यांची  हिंमत होणार नाही. वाढत्या अवैध धंद्यामुळे  कोपरगावमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. गटागटामध्ये कायम शितयुध्द सुरू असुन मारामारी, वादविवाद नित्याचेच झाल्याने सर्व सामान्य नागरीक दहशतीत वावरतोय.

 पोलीस निरीक्षक रामचंद्र कुंभार हे सध्या तरी अवैध धंदे बंद करण्यात यशस्वी झाले आहेत. येत्या काळात जर पुन्हा अवैध धंदे जोमाने सुरु झाले तर कोपरगावच्या जनतेची भ्रमनिराशा होवू शकते.  पोलीस आणि अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये काही तरी हितसंबंध जुळल्यामुळेच  सुरु झालेत हे सिध्द होण्यास वेळ लागणार नाही. सध्या सर्व अवैध व्यवसाय बंद असल्याने अनेकांचे अर्थकारण बिघडले आहे. पोलीसांच्या भुमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तर सर्व सामान्य नागरीकांना सध्या दिलासा मिळाला आहे.

 जर एका पोलीस अधिकाऱ्यामुळे सर्व अवैध धंदे बंद झाले तर या पुर्वी अवैध धंदे कोणाच्या आशीर्वादाने जोरात सुरु होते. असा सवाल सर्वसामान्य नागरीकांना पडला आहे.

Leave a Reply