कान्हेगाव रेल्वे स्थानकावर डेम्यू पॅसेंजरला एकनंबर प्लॅटफॉर्मवर थांबा द्या

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : तालुक्यातील कान्हेगाव रेल्वे स्थानकावरील दादरचे काम तातडीने सुरू करावे तसेच काम होईपर्यंत डीझेल इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट (डेम्यू) निजामाबाद ते पुणे ही गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर उभी करण्यात यावी.

मनमाड – दौंड रेल्वे मार्गावरील कान्हेगाव रेल्वे स्टेशन हद्दीतील समपार फाटक क्रमांक 62 च्या हद्दीत भुयारी बोगद्याची निर्मिती करून प्रवाशांची गैरसोय टाळावी, या मागणी संदर्भातील निवेदन वारी येथील राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या शिष्टमंडळाच्या वतीने शुक्रवारी (दि.27) कान्हेगाव रेल्वे स्थानकाचे प्रबंधक चंद्रभूषण शर्मा यांच्याकडे देण्यात आले.

      निवेदनात म्हंटले, मनमाड- दौंड या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम जलदगतीत सुरू असून मनमाड ते पुणतांबा दरम्यान हे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर दिवसाला 50 पेक्षा जास्त रेल्वे धावत आहेत. रेल्वे प्रवाशांची सोय व्हावी, यासाठी कान्हेगाव रेल्वे स्थानक परिसरात दोन प्लॅटफॉर्मची निर्मिती सुरू असून सद्यस्थितीत काम अपूर्ण आहे, दोन्ही प्लॅटफॉर्मवरून प्रवाशांना जाण्यायेण्यासाठी दादरचे काम देखील सुरू करण्यात आलेले नाही, त्यामुळे प्रवाशांची खूप गैरसोय होत आहे. हे काम तातडीने सुरू करून प्रवाशांना दिलासा द्यावा.

     त्याचबरोबर जोपर्यंत दादरचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत या मार्गावरून धावणाऱ्या डीझेल इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट ( डेम्यू ) निजामाबाद ते पुणे ( क्र.११४१०) मनमाडहून पुण्याकडे जातांना कान्हेगाव रेल्वे स्टेशनवरून सकाळी १२ वाजून १० मिनिटांच्या सुमारास ही गाडी येते. या गाडीतून प्रवास करण्यासाठी वारी, कान्हेगाव, सडे, खोपडी, भोजडे, तळेगाव मळे, धोत्रे, गोधेगाव, दहिगाव बोलका, संवत्सर आदी गावातील प्रवासी मोठ्या संख्येने कान्हेगाव रेल्वे स्थानकावर येतात. यामध्ये महिला, पुरुष, वयोवृद्ध, लहान मुले तसेच दिव्यांग बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर टिकीट काढल्यानंतर सदरची गाडी ही प्लॅटफॉर्म क्रमांक दोन च्या बाजूला असलेल्या मेन लाईन वर उभी राहते. या गाडीत बसण्यासाठी जात असताना या सर्व प्रवाशांना प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरून रेल्वे लाईन ओलांडून गाडीमध्ये बसण्यासाठी जावे लागत आहे. यातून या रेल्वेमध्ये बसताना मोठी कसरत करावी लागत आहे.

प्रसंगी यातून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सद्यस्थितीत मनमाडहून पुणे कडे जाणाऱ्या या रेल्वेगाडीला प्रवाशांचा अपघात व गैरसोय टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर थांबा देण्यात यावा. जेणेकरून प्रवाशांना दिलासा मिळेल आणि त्यांचा प्रवास सुखकर होईल.

      यावेळी राहुल दादा मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पत्रकार रोहित टेके, कृष्णप्रिया वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. विनायक महाराज टेके, नाद संगीत विद्यालयाचे संचालक ह.भ.प. शंकर महाराज गोंडे, सेवानिवृत्त अधिकारी मदन काबरा, वारीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सतीशराव कानडे, ग्रामपंचायत सदस्य योगेश झाल्टे, गौतम डोसी,गणेश भाटी,स्वप्निल टेके, शंकर धामणे, रोहन रोकडे, सक्षम आवारे उपस्थित होते.

Leave a Reply