शहराच्या विविध प्रश्नांकडे मुख्याधिकाऱ्यांचे वेधले लक्ष

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ : कोपरगाव विधानसभा मतदार संघातील गावांबरोबरच कोपरगाव शहरासाठी देखील आ.आशुतोष काळे यांनी नागरीकांना अपेक्षित असलेल्या विविध विकासकामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिलेला आहे. परंतु या निधीतील अनेक कामे प्रलंबित आहेत तर काही कामांना तर अद्याप सुरुवात देखील झालेली नाही. त्यामुळे नागरीकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी सुहास जगताप यांना लेखी निवेदन देवून कोपरगाव शहराच्या विविध विकास कामांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले.

दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, आ. आशुतोष काळे यांनी केलेल्या अथक प्रयत्नातून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अनमोल सहकार्यातून राज्य शासनाकडून कोपरगाव शहराच्या विविध विकासकामांसाठी कोपरगाव नगरपरिषदेस भरघोस निधी आणला आहे. या निधीतून बहुतांश विकास कामे पूर्ण होवून नागरीकांच्या अडचणी कमी देखील झाल्या आहेत.

परंतु कोपरगाव नगरपरिषदेला मिळालेल्या निधीतील अनेक कामे अद्यापही प्रलंबित आहेत त्याचा कोपरगाव शहरवासीयांना त्रास सहन करावा लागत असून त्याबाबत नागरीकांच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे ज्या विकासकामांना अद्याप सुरुवात होवू शकली नाही त्या विकासकामाच्या संबंधित ठेकेदारास सूचना देवून ती विकासकामे तातडीने सुरु करावी.

तसेच सध्या पावसाळा सुरु असून पावसाळ्यापूर्वी करावयाची काही कामे अद्यापही झालेली नसल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यात होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी जीर्ण झालेल्या इमारती, वाऱ्यामुळे पडू शकणारे वृक्ष, रस्त्यात आडवे येणारे विजेचे पोल व वीजवाहिन्या आदी गोष्टींमुळे कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही यासाठी उपाय योजना कराव्यात.

तसेच  शहरातील मोठ्या गटारी व नाले सफाई, मोकाट जनावरे तसेच शहरातील स्वच्छतेसह नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत.नागरिकांच्या तक्रारींची दखल घेवून तातडीने कार्यवाही करावी असे मुख्याधिकारी सुहास जगताप यांना दिलेल्या निवेदनात शेवटी म्हटले आहे.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply