धार्मिक स्थळांच्या विकासातून संस्कृतीचे संवर्धन – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ६ :  धार्मिक स्थळे श्रद्धा व एकतेचे प्रतीक असून धार्मिक स्थळांचा विकास म्हणजे केवळ सौंदर्यवाढ नसून हा विकास सामाजिक ऐक्य, परंपरा समृद्ध संस्कृतीच्या संवर्धनाचा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. धार्मिक स्थळे व तीर्थक्षेत्रांचा विकास समाज मनाच्या जडणघडणीसाठी अत्यंत आवश्यक असून धार्मिक स्थळांच्या विकासातून संस्कृतीचे संवर्धन होत असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले.

आषाढी एकादशीचा मुहूर्त साधत राज्य शासनाच्या पर्यटन विभागाच्या तिर्थक्षेत्र व पर्यटन विकास अंतर्गत माहेगाव देशमुख येथील श्री अमृतेश्वर महादेव मंदिर परिसरातील सभामंडप व सुशोभीकरण कामाचा शुभारंभ आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, श्री अमृतेश्वर महादेव मंदिर हे केवळ श्रद्धेचे स्थळ नाही, तर गावातील विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे केंद्रस्थान आहे. महाशिवरात्र व श्रावण महिन्यात भाविकांची श्री अमृतेश्वराचे दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. तसेच एकादशीला दुसऱ्या दिवशी होत असलेला प्रदोष कार्यक्रमासाठी देखील मोठ्या संख्येने भाविक येतात. त्या भाविकांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा मिळाव्यात या दृष्टीकोनातून केलेल्या पाठपुराव्यामुळे श्री अमृतेश्वर महादेव मंदिर परिसरातील सभामंडप व सुशोभीकरण कामासाठी ५० लक्ष निधी मिळविला आहे.

शिव भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अमृतेश्वर महादेव मंदिराचा सर्वांगीण विकास हा गावाच्या सर्वांगीण प्रगतीस हातभार लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी माहेगाव देशमुख गावचे सुपुत्र, भारतीय सैन्याच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये २८ वर्षे देशसेवा करून ऑ.लेफ्टनंट पदावरून नुकतेच सेवानिवृत्त झालेले वाल्मिक शिवराम पानगव्हाणे यांचा आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी श्री अमृतेश्वर देवस्थान ट्रस्ट, श्री दत्त दिगंबर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त, सरपंच, उपसरपंच व सदस्य, माहेगाव देशमुख विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मे आणि जून महिन्यात पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत होवून चालू वर्षी भरघोस उत्पन्न मिळेल या आशेपोटी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खरीप पिकांच्या पेरण्या केलेल्या आहेत. आज रोजी खरीप पिकांना पावसाची अत्यंत आवश्यकता असतांना मात्र जवळपास तीन आठवड्यापासून कोपरगाव मतदार संघावर पाऊस रुसला आहे. पंढरीच्या पांडुरंगा वरुणराजाला पुन्हा कोपरगाव मतदार संघावर कृपा करण्यास सांगावी व माझ्या बळीराजाला सुखी करावे असे साकडे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी  पंढरीच्या पांडुरंगाला घातले.  

Leave a Reply