गोदावरी कालव्यांना तातडीने ओव्हर फ्लोचे पाणी द्या – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ६ : चालूवर्षी मे महिन्यात पावसाने सर्वत्र जोरदार हजेरी लावल्यामुळे व हवामान विभागाने देखील भरपूर पर्जन्यमान होणार असल्याचा अंदाज दिल्यामुळे कोपरगाव मतदार संघातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खरीप पिकांच्या पेरण्या केल्या आहेत. परंतु जून महिन्यात अपेक्षित पर्जन्यमान झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या असून गोदावरी कालव्यांना तातडीने ओव्हर फ्लोचे पाणी सोडावे अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.

साधारणत: जून महिन्यापासून सुरु होणाऱ्या पावसाचे मे महिन्यातच मोठ्या थाटात आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होऊन पुढील पावसाच्या भरवशावर कोपरगाव मतदार संघात सोयाबीन, बाजरी, मका, कापूस, भुईमुग आदी खरीप पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे.

परंतु जून महिना संपून जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरी कोपरगाव मतदार संघात खरीप पिकांसाठी आवश्यक असलेले पर्जन्यमान झालेले नाही व त्यामुळे भूजलपातळी देखील वाढलेली नाही. पुढील काळात जर पावसाने अशीच उघडीप दिली तर खरीप पिकांना व बारमाही पिकांना त्याचा फटका बसून शेतकऱ्यांचे नुकसान होवू शकते व पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न निर्माण होवू शकतो.

एकीकडे कोपरगाव मतदार संघात जरी पावसाने उघडीप दिली असली तरी मे व जून महिन्यात धरण क्षेत्रात मात्र समाधानकारक पाऊस झालेला असून अधून मधून आषाढ सरी सुरु आहे. त्यामुळे नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीमध्ये जवळपास १० ते १२ हजार क्युसेक विसर्ग सुरु असून जायकवाडी धरणामध्ये जिवंत पाणी साठा ४६ टक्के इतका झाला आहे. तर दुसरीकडे मात्र गोदावरी कालवे बंद आहे.

गोदावरी कालव्यांना ओव्हर फ्लोचे पाणी सोडल्यास भूजलपातळी वाढण्यास मदत होवून शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी उपलब्ध होईल व अडचणीच्या काळात हेच पाणी खरीप पिकांना देवून शेतकऱ्यांना आपले खरीप पिक वाचविता येईल. त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून तातडीने गोदावरी कालव्यांना ओव्हर फ्लोचे पाणी सोडावे अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply