प्रत्येक ग्रामपंचायतींसाठी स्वयंचलीत हवामान केंद्र बसवणार – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : पर्जन्यछायेखाली येत असलेल्या कोपरगाव मतदार संघातील मोजक्याच गावांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र असल्यामुळे कमी पर्जन्यमान किंवा अतिवृष्टीमुळे नुकसान होवूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजनांचा फायदा मिळत नव्हता. त्यामुळे कोपरगाव मतदार संघात जास्तीत जास्त स्वयंचलित हवामान केंद्र बसवावे अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी लावून धरली होती. त्या मागणीला अखेर यश आले असून कोपरगाव मतदार संघातील ज्या गावात स्वयंचलित हवामान केंद्र नाही त्या प्रत्येक ग्रामपंचायतींसाठी स्वयंचलित हवामान केंद्र बसविले जाणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव तालुक्याच्या सहा मंडलामध्ये एकूण सहा स्वयंचलीत हवामान केंद्र अस्तित्वात आहे. हि संख्या अत्यंत कमी असल्यामुळे पिक विम्याचे निकष लावतांना अडचणी निर्माण होवून मागील अनेक वर्षापासून बहुतांश शेतकरी अतिवृष्टी, पूर, दुष्काळ व हवामान आधारित फळबाग पीकविमा योजनेपासून वंचित राहत होते. त्याबाबत आ.आशुतोष काळे यांनी २०१९ ला निवडून येताच कृषी विभागाकडे कोपरगाव तालुक्यात स्वयंचलीत हवामान केंद्रांची संख्या  वाढवावी अशी राज्यातून सर्वप्रथम मागणी केली होती.

त्याबाबत तात्कालीन कृषी मंत्री व तात्कालीन पालकमंत्री यांच्याकडे देखील त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याची दखल घेवून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२५ चा अर्थसंकल्प मांडतांना ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारणार हा अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाची अंमलबजावणी केद्र व राज्य शासन संयुक्तपणे करणार असून त्यासाठी केंद्र शासनाच्या डब्ल्यूआयएनडीएस प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे.

आ.आशुतोष काळेंच्या पाठपुराव्यातून शासनाने स्वयंचलीत हवामान केंद्र बसविण्याचा घेतलेला निर्णय कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. कोपरगाव मतदार संघ पर्जन्यछायेखाली येत असून मतदारसंघात पर्जन्यमान नेहमीच कमी असते. त्यामुळे अतिवृष्टी किंवा कमी पर्जन्यमान होवूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यात अडचणी येत होत्या तसेच शासनाच्या विविध योजना व अनुदानाचा फायदा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळत नव्हता. त्यामुळे दुष्काळ, अतिवृष्टी आदी नैसर्गिक नुकसानीच्या अचूक माहितीसाठी मतदार संघात स्वयंचलित हवामान केंद्रांची संख्या वाढवावी यासाठी आ. आशुतोष काळेंचा  पाठपुरावा सुरु होता. 

त्या पाठपुराव्यातून ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्यासाठी  केद्र व राज्य शासनाणे संयुक्तपणे घेतलेला पुढाकार शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय आहे. हवामानाची अचूक माहिती, हवामानाबद्दल कृषीविषयक सल्ला व मार्गदर्शन तसेच नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने आवश्यक माहिती मिळणार आहे. त्यामुळे अतिवृष्टी, पूर किंवा दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही त्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

Leave a Reply