कोपरगावमध्ये अंधश्रद्धेने घेतला महिलेचा बळी 

कोपरगावात फादर विरूद्ध जादू टोणा प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल

कोपरगाव प्रतिनिधी, दि १२ : सध्या जग एकविसाव्या शतकात असला तरी भारतात अजूनही अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात रुजलेली आहे. विज्ञान इतके पुढे गेले आहे की, आज कोणतीही गोष्ट अशक्य नाही.अंधश्रद्धामुळे अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे याची प्रचिती नुकतीच कोपरगावत घडली आहे.

याबाबतीत अधिक असे की, काविळ झालेल्या महिलेला औषधोपचार न घेण्याचा सल्ला देऊन मंत्र मारून पाणी अंगावर शिंपडले, तेल कपाळावर लावण्यास दिले. त्यानंतर काही दिवसांतच महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या फादर चंद्रशेखर गौडा विरूद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय जीवन पंढरे हे कोपरगाव शहरातील खडकी परिसरात राहतात. त्यांच्या घराजवळच बहिण वनिता विश्वनाथ हरकळ राहाते.

दि. १ जुलै रोजी वनिता आजारी पडली. तीला संजय पंढरे यांचा पुतण्या विवेक पंढरे डॉक्टरांकडे घेऊन गेला. त्यानंतर पुन्हा ३ जुलै रोजी डॉक्टरांनी तपासण्या केल्यानंतर काविळ झाल्याचे सांगितले. काही जणांनी आयुर्वेदिक औषधी घेण्याचा सल्ला दिला. पुतण्या संजय पंढरे हा सायंकाळी औषधी घेऊन घरी आला तेव्हा समता नगर चर्चमधील फादर चंद्रशेखर गौडा हे वनिता यांच्या शेजारी बसलेले होते. ते म्हणाले, यांना कुठलाही आजार नाही, कोणतेही औषध घेऊ नका, त्यांना बाहेरचे झाले आहे.

त्यानंतर फादरने त्यांच्याकडे असलेल्या तेलाच्या बाटलीवर हात ठेऊन मंत्र म्हणले, हे तेल कपाळावर लावण्याचे सांगितले. बाटलीतील पाणी हातावर घेऊन मंत्र मारून ते पाणी वनिता यांच्या अंगावर शिंपडले व दिवसातून तीन-चार वेळेस हे पाणी पिण्याचा सल्ला दिला. हे कृत्य केल्याने दि. ४ जुलै रोजी वनिता यांची प्रकृत्ती आणखीनच खालावली. त्याच दिवशी वनिता यांना लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

डॉक्टरांनी तेथे ॲडमिट करून घेतले. औषधोपचार सुरू असताना दि. ९ जुलै रोजी वनिता हारकळ यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस फादर चंद्रशेखर गौडा हे कारणीभूत असल्याची फिर्याद संजय पंढरे यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दिली. या फिर्यादीवरून चंद्रशेखर गौडा विरूद्ध भा.न्या.सं. कलम १०६ (१)सह महाराष्ट्र जादु टोणा प्रतिबंधक अधिनियम २०१३चे कलम ३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार हे करीत आहेत.