गोदावरी कालव्यांना तातडीने ओव्हरफलोचे पाणी सोडा – स्नेहलता कोल्हे

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १२ :  गेल्या दीड महिन्यांपासुन पावसाने ओढ दिली आहे, खरीप पीके पाण्यांवर आली आहेत, तेंव्हा गोदावरी कालव्यांना तातडींने ओव्हरफलोचे पाणी देवुन बंधारे, गांवतळी, पाझरतलाव भरून द्यावीत अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंत्याकडे केली आहे.

कोल्हे पुढे म्हणाल्या की, कालवे लाभक्षेत्रात पावसाने ओढ दिली, उन्हाचा चटका मोठ्या प्रमाणांत वाढला आहे, उन्हाळयात झालेल्या पावसामुळे खरीपाचे पुर्णपणे नियोजन करणे शेतक-यांना अडचणीचे वाटु लागले आहे, या पिकांना वेळेवर पाणी मिळाले नाही तर शेतक-यांच्या हातुन पीके निघुन जावुन आर्थीक फटका जादा बसणार आहे.

दारणा गंगापुर धरण कार्यक्षेत्रात पावसाचे पर्जन्यमान ब-यापैकी आहे. परतीचा मान्सुन अजुन व्हायचा आहे तेंव्हा गोदावरी कालव्यांना तातडीने ओव्हरफ्लोचे पाणी सोडुन या शेतक-यांना दिलासा द्यावा, उजव्या कालव्यावरील हरिसन ब्रांच चारी लाभधारक व टेलच्या तसेच पुर्वभागातील असंख्य शेतक-यांनी आपल्याकडे खरीपाला पाणी मिळावे अशी मागणी केली आहे.

वेळेत पाणी मिळाले नाही तर शेतक-यांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान होईल, तसेच पशुधन जगवायचे कसे हा देखील प्रश्न आहे. गोदावरी उजव्या आणि डाव्या कालव्यावरील लाभधारक शेतक-यांना सध्या पाण्याची नितांत गरज आहे. तेंव्हा नाशिक पाटबंधारे विभागांने सर्व परिस्थितीचा आढावा घेवुन गोदावरी कालव्यांना ओव्हरफलोचे पाणी सोडावे व सर्व बंधारे, पाझरतलाव, गांवतळी भरून शेतक-यांना दिलावा द्यावा असे स्नेहलता कोल्हे शेवटी म्हणाल्या.