कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : कुठल्याही खटल्यात एकटा न्यायाधीश न्याय करत नाही. कारण सत्यशोधन करून तो खटला कायद्यात बसवणे आणि कायदेशीर पुराव्यांआधारे न्याय करणे हे न्यायालयाचे काम असते. त्यामुळे अशा पुराव्यांसाठीच्या सत्यशोधनात समाजाचे सहकार्य मिळणे खूप महत्त्वाचे आणि आवश्यक असते, असे प्रतिपादन कोपरगाव जिल्हा न्यायाधीश स. बा. कोऱ्हाळे यांनी केले.
येथील एस. एस.जी.एम. कॉलेज आणि कोपरगाव तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय विधी जागृती आणि प्रचार अभियानांतर्गत नुकतेच ‘कायदेविषयक शिबिर’ संपन्न झाले. या शिबिराचे अध्यक्षीय मार्गदर्शन करताना न्यायमूर्ती कोऱ्हाळे यांनी आपले विचार मांडले. विधी सेवा समितीच्या स्थापनेमागील पार्श्वभूमी सांगण्यापासून ते पोकायद्यापर्यंत अनेक कायदेशीर बाबींची माहिती करून देत, न्यायमूर्ती कोऱ्हाळे यांनी कायदा साक्षरता आणि प्रसारात विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे पटवून दिले.
या शिबिर प्रसंगी अतिरिक्त न्यायदंडाधिकारी भगवान पंडित, विधिज्ञ येवले, प्राचार्य डॉ.आर. आर. सानप यांनीही आपले विचार व्यक्त केले. न्यायदंडाधिकारी भगवान पंडित यांनी कवी सुरेश भटांच्या काव्यपंक्तींचा वापर करत मार्मिकपणे विचार मांडताना, नागरिकांची कर्तव्य, हक्क व त्यांची जाणीव यातून होणारे कायदापालन याविषयी माहिती दिली.
अस्वास्थ परिस्थितीतही नागरिकांनी स्वस्थ बसणे हे विकासाला मारक असते आणि ज्ञानातून विकास साधने शक्य असते. त्यामुळे कायदेविषयक ज्ञानजागृती करण्याच्या विधी समितीच्या मोहिमेत विद्यार्थ्यांनी आपले योगदान द्यावे. असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
विधिज्ञ येवले यांनी स्वानुभव कथन करुन विद्यार्थ्यांच्या अंतरंगाला हात घालत अगदी सहज व सोपेपणाने कायद्याची संकल्पना व पायाभूत तत्व समजावून दिले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सानप यांनी समाज सुव्यवस्था व स्वास्थ्य यासाठी कायद्यांचे पालन महत्त्वाचे असते. तसेच न्याय संस्थेचा आपण स्वीकार केलेला असल्याने कायद्याचे पालन करणे हे नागरिकांचे कर्तव्य असल्याची भावना बोलून दाखविली आणि ही भावना विद्यार्थ्यांनी समाज मनापर्यंत पोहोचवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय याद्वारे प्रा. डॉ. वैशाली सुपेकर यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. सदर कार्यक्रमाला विधिज्ञ वाबळे, विधिज्ञ नगरकर महाविद्यालयातील सर्व शाखांचे उपप्राचार्य, प्राध्यापक, महाविद्यालयीन अधीक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. उज्ज्वला भोर यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. रोहिणी डिबरे यांनी केले.