कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ५२.७१ लाखाचे अनुदान मंजूर – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१३ : शासनाने दोन वर्षापूर्वी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान जाहीर केले होते, मात्र पात्र असूनही तांत्रिक अडचणीमुळे कोपरगाव तालुक्यातील अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित होते. त्याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून महायुती शासनाकडून कोपरगाव तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ५२ लाख ७१ हजार ६४४ रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.  

कृषी उत्पन्न बाजार समिती, खासगी बाजार समिती व नाफेडला १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रती शेतकरी २०० क्विंटल पर्यंत ३५० रुपये प्रती क्विंटल याप्रमाणे अनुदान मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. परंतु काही तांत्रिक अडचणी व कागदपत्रांची अपूर्तता यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अनुदानासाठी पात्र असतांना देखील त्यांना अनुदान मिळाले नव्हते.

हि बाब लक्षात घेवून आ.आशुतोष काळे यांनी मतदार संघातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना समक्ष भेटून लेखी निवेदन देखील दिले होते. व आजतागायत त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्यातून अखेर महायुती शासनाने कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला असून पात्र असलेल्या परंतु तांत्रिक अडचणीमुळे अनुदान न मिळालेल्या एकूण २१० शेतकऱ्यांना ५२ लाख ७१ हजार ६४४ रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. केलेल्या पाठपुराव्याची दखल घेवून ५२.७१ लाख रुपये अनुदान मंजूर केल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांचे आभार मानले आहे.