‘क’ वर्ग देवस्थानांच्या ५० लाखांच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता – आ.आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १ : धार्मिक व ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या कोपरगाव तालुक्यात अनेक धार्मिक देवस्थान असून लाखो भाविकांचे ते श्रद्धास्थान आहेत. यात्रा उत्सव प्रसंगी दरवर्षी लाखो भाविक या धार्मिक स्थळी दर्शनासाठी येतात. येणाऱ्या भाविकांना उच्च दर्जाच्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी या देवस्थानांना ‘क’ वर्ग दर्जा मिळवून दिला आहे.

देवस्थानच्या विकासासाठी शासनाकडून निधी मिळविण्याचा मार्ग मोकळा होवून तालुक्यातील चार देवस्थानांना ५० लाखाचा निधी मंजूर करून आणला होता. या विकास कामांना तातडीने प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी सुरु असलेल्या पाठपुराव्यातून या ५० लाखाच्या विकास कामांना नुकतीच प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून लवकरच विकास कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.  

यामध्ये माहेगाव देशमुख येथील श्री अमृतेश्वर मंदिर परिसर सुशोभिकरण करणे (२०लाख), चांदेकसारे येथील श्री क्षेत्र भैरवनाथ जोगेश्वर मंदिर परिसर सुशोभिकरण करणे (१०लाख), भोजडे येथील श्री राजा वीरभद्र देवस्थान मंदिर परिसर सुशोभिकरण करणे (१०लाख), कोकमठाण येथील श्री लक्ष्मी माता मंदिर देवस्थान या ठिकाणी पथदिवे बसविणे (१०लाख) या देवस्थानांचा समावेश असून या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना अधिकच्या सोयी सुविधा मिळून त्यांच्या अडचणी दूर होणार आहेत.त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून माहेगाव देशमुख, चांदेकसारे, भोजडे व कोकमठाण येथील ग्रामस्थांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.   

कोपरगाव मतदार संघाची धार्मिक परंपरा जपतांना मतदार संघातील सर्व धार्मिक स्थळांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आ. आशुतोष काळे यांनी विशेष प्रयत्न करून अनेक तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग दर्जा मिळवून दिला. ‘क’ वर्ग दर्जा मिळाल्यामुळे संबंधित तीर्थक्षेत्रांना शासनाकडून अधिक प्रमाणात निधी उपलब्ध होऊन विकासकामे गतिमान होत आहेत. या तीर्थक्षेत्रांचा विकास जलदगतीने होईल व भाविकांना चांगल्या सुविधा मिळणं हा माझा प्रामाणिक हेतू साध्य होणार याचा विशेष आनंद होत असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे. 

५० लाखाच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांचे आ.आशुतोष काळे यांनी आभार मानले आहे.

Leave a Reply