कोपरगांव प्रतिनिधी, दि. ५ : तंत्रज्ञान अधिक वेगाने विकसीत होत असुन त्याचा फायदा शेतक-यांना व्हावा यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृक्षी विद्यापीठ अकोला व महाबीज यांच्या संयुक्त विद्यमाने विकसीत केलेल्या महाबीज सुवर्णा सोयाबीन प्लॉटची महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. विवेक शिंदे व शासनाच्या कृषी खात्याचे उपविभागीय अधिकारी प्रविण गोसावी यांनी भेट देवुन नुकतीच पाहणी केली. त्यात एका झाडाला २५० ते ३०० शेंगा लगडल्या आहेत.

तालुक्यातील चासनळी येथील प्रगतशिल शेतकरी किशोर रावसाहेब गाडे हे दरवर्षी सोयाबीन पीक वाणाची लागवड करतात. यंदा त्यांनी त्यांचे शेतात महाबीजच्या सुवर्णा वाणाची सोयाबीन पेरणी केली आहे.

महाबीज सुवर्णा सोयाबीन वाणांच्या शेंगावर लव असल्यांने विविध किडी व अळी पासुन पीकाचा बचाव होतो. हार्वेस्टींगसाठी २० दिवस उशीर जरी झाला तरी यातील दाणे फुटत नाही व जादा पाणी झाले तरी झाडावर त्याचा परिणाम होत नाही. पांढरे शुभ्र दाणे असुन नविन सुधारीत वाणांमध्ये बहुतांश शेतक-यांनी त्यास विशेष पसंती दिली आहे. शेतक-यांना जास्तीचे उत्पादन मिळावे म्हणून महाबीज व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी अधिकाधिक प्रयोग करून सोयाबीनचे हे वाण विकसीत केले.

तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांनी प्रगतशिल शेतकरी किशोर गाडे यांनी लागवड केलेल्या सोयाबीन वाणाची माहिती घेवुन अधिक उत्पादनासाठी मौलिक मार्गदर्शन केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, महाबीज अधिका-यांनी या वाणाबाबत समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी गुणनियंत्रण निरीक्षक गणेश बिरदवडे, कृषी मंडळ अधिकारी तेजस्वी मोटे, महाबीजच्या सहायक क्षेत्रीय अधिकारी श्रीमती एन. पी. काळे, कृषी अधिकारी एस. पी. नाईक, सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाचे महाबीजचे क्षेत्रीय विकास अधिकारी ढवळे, चव्हाण, चासनळी सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव गाडे, अध्यक्ष विष्णु चांदगुडे यांच्यासह पंचक्रोशीतील विविध शेतकरी उपस्थित होते. शेवटी किशोर गाडे यांनी आभार मानले.
