कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ : आमदार आशुतोष काळे यांच्या निकृष्ट कामांची बाजू सावरण्यासाठी पक्षातील पहिल्या फळीतील कुठलाही नेता पुढे येऊ शकला नाही. त्यामुळे दुर्दैवाने कधीमधी उगवणाऱ्या भूछत्रासारख्या कार्यकर्त्याच्या नावाने बातमी प्रसिद्ध करण्याची वेळ आमदार काळे यांच्यावर आली आहे, असा निषेध युवकांनी व्यक्त केला. कोणी काय केले काय नाही हे बोलण्याचा नैतिक अधिकार तरी आपल्याला आहे का याचा विचार अशा भूछत्राने करावा. ज्या मतांची मग्रुरी दाखवली जात आहे ती उतरवण्याचे काम देखील येत्या काळात जनता करेल असा जोरदार हल्ला शरद त्रिभुवन यांनी आमदार काळे यांच्यावर केला आहे.

कोपरगाव शहरात नुकतेच युवकांनी रस्त्यावर झालेल्या खड्ड्यात बसून होडी छोडो आंदोलन केले. या आंदोलनात “आमदार काळे रस्त्यावर तळे”, “तीन हजार कोटी फिरायला बोटी” अशा उपरोधक घोषणा देत काळे गटाच्या कारभारावर जोरदार हल्ला चढवला. या आंदोलनाने काळे गटाला चांगलीच मिरची लागली असून, त्यांनी पिछाडीच्या कार्यकर्त्याच्या नावाने युवकांनी केलेल्या निषेधावर टीका करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न फसला असून जनतेत त्याला प्रतिसाद मिळाला नाही.

यावर प्रतिक्रिया देताना शरद त्रिभुवन म्हणाले की, भाडोत्री कार्यकर्त्यांच्या नावाने उत्तर द्यावे लागत असेल तर ते हास्यास्पद आहे. भ्रष्टाचाराची टक्केवारी आणि निकृष्ट कामांमुळे जनतेला प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. सत्तेच्या नशेत असलेल्या लोकांना याची जाणीव नाही. त्यामुळे त्यांनी युवकांच्या आंदोलनाचा धसका घेतला आहे आणि आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन घाईघाईत प्रेसनोट प्रसिद्ध केली आहे.

त्रिभुवन यांनी पुढे स्पष्ट केले की, जनतेचे प्रश्न सोडविण्याऐवजी आंदोलनावर टीका करणारे खऱ्या अर्थाने जनतेपासून तुटलेले आहेत. युवकांचा हा रोष हा जनतेचा आवाज आहे आणि हा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनता योग्य उत्तर देईल.

मिळालेली मते ही तुमच्या एकट्याची जहागिरी नाही. आम्ही नागरिक म्हणून केलेले मतदान वाया गेले याची प्रचिती आम्हाला आली ही नागरिकांची जनभावना आहे अशी प्रतिक्रिया युवकांनी दिली आहे.
